लेखकांसाठी लोकमत हक्काचे व्यासपीठ; राजेंद्र दर्डा यांनी ‘लिटफेस्ट’ची मांडली कल्पना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 06:45 AM2023-03-26T06:45:27+5:302023-03-26T06:45:37+5:30
फक्त आणि फक्त साहित्यिकांसाठी एक सन्मान सोहळा असावा, ही भूमिका घेऊन ‘लोकमत साहित्य पुरस्कार’ची सुरुवात केल्याचे लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी सांगितले.
ठाणे : अनेक मोठ्या पुरस्कार सोहळ्यांत ज्या कथेवर, कादंबरीवर चित्रपट बनतात, मालिका बनतात, त्या लेखकांना अवघ्या काही क्षणात पुरस्कार देऊन रवाना केले जाते. मात्र, लेखकांसाठी, पुस्तकांसाठी आज देशात कोणत्याही माध्यम समूहाकडून स्वतंत्रपणे पुरस्कार दिला जात नाही. फक्त आणि फक्त साहित्यिकांसाठी एक सन्मान सोहळा असावा, ही भूमिका घेऊन ‘लोकमत साहित्य पुरस्कार’ची सुरुवात केल्याचे लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी सांगितले.
येत्या काही वर्षांत ‘लोकमत साहित्य पुरस्कार’ हा साहित्य महोत्सवामध्ये परिवर्तित व्हावा, लोकमत लिटफेस्ट आकाराला यावे, त्यात वेगवेगळ्या भाषांची पुस्तके यावीत, देशभरातले लेखक, कवी त्या ठिकाणी यावेत आणि त्या व्यासपीठावरून मराठी साहित्याचा गौरव व्हावा, ही ‘लोकमत’ची इच्छा असल्याचेही त्यांनी बोलून दाखविले. ‘लोकमत’ने साहित्य पुरस्कारांची परंपरा सुरू केली. या आधीचे तीनही सोहळे पुण्यात झाले. त्यात श्याम मनोहर, द. मा. मिरासदार, रा. चिं. ढेरे यांचा गौरव ‘लोकमत’ने केला आहे, असे सांगून राजेंद्र दर्डा पुढे म्हणाले की, यंदा हा सोहळा ठाण्यात होतोय.
अनेकानेक अजरामर गीते लिहिणाऱ्या जनकवी पी. सावळाराम यांचे हे ठाणे. या ठाण्यात ‘लोकमत साहित्य पुरस्कार सोहळा’ आपल्या सर्वांच्या साक्षीनं व्हावा, यासारखा दुसरा कोणताही सुंदर योग नाही. ज्यांना ‘ज्ञानपीठ’ने गौरविले ते भालचंद्र नेमाडे यांना आपण ‘जीवनगौरव पुरस्कार’ने सन्मानित करत आहोत, यासारखा दुसरा आनंद नाही, असे सांगून दर्डा पुढे म्हणाले की, नेमाडेंची भूमिका नेहमीच सुस्पष्ट, परखड आणि तत्वनिष्ठ राहिलेली आहे. नेमाडे यांनी आपल्या साहित्यसाधनेतून स्वतःचं वेगळेपण आणि स्वतंत्र भूमिका सातत्याने मांडली आहे. साहित्यासारख्या क्षेत्रात अनेकदा बुद्धिभेद करून वैचारिक गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न होताना आपण पाहत असतो. अशा वातावरणात स्वतःची ठाम भूमिका घेऊन ती सातत्याने मांडत राहणं यासाठी तपश्चर्या, साधना असावी लागते. उपस्थित साहित्यिकांचे आणि विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन केले.