बोईसर आरोग्य केंद्राची दुर्दशा
By admin | Published: December 8, 2015 12:24 AM2015-12-08T00:24:17+5:302015-12-08T00:24:17+5:30
बोईसरचे ग्रामीण रुग्णालय २००३ साली मंजूर होऊन तत्कालीन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी ९ नोव्हेंबर २०१२ रोजी त्याचे उद्घाटन केले. परंतु, त्याची नियोजित जागा आजही लालफितीत
पंकज राऊत, बोईसर
बोईसरचे ग्रामीण रुग्णालय २००३ साली मंजूर होऊन तत्कालीन आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांनी ९ नोव्हेंबर २०१२ रोजी त्याचे उद्घाटन केले. परंतु, त्याची नियोजित जागा आजही लालफितीत अडकल्याने रुग्णालय सध्या तात्पुरत्या जागेत सुरू असून तेथे सोळा कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. तर, बोईसर आणि परिसराचा भाग दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांत विभागल्याने योग्य नियोजनाअभावी येथे आरोग्य आरोग्यसेवेची परिस्थिती दारुण आहे.
तारापूर अणुऊर्जा एक व दोन आणि तीन व चार असे दोन प्रकल्प, भाभा अणुसंशोधन केंद्र (बीएआरसी), आशिया खंडातील महत्त्वाचे तसेच मोठे मानले जाणारे तारापूर (एमआयडीसी) औद्योगिक क्षेत्र या महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे बोईसर आणि परिसरातील गावांची लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. विशेष आणि आश्चर्याची बाब म्हणजे तारापूर प्रा. आरोग्य केंद्राच्या अधिपत्याखाली सालवड, शिगाव व हनुमाननगर ही तीन उपकेंद्रे येत असून तारापूर ते हनुमाननगर हे अंतर सुमारे पंधरा किमी आहे, तर दांडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिपत्याखाली बोईसर भागातील काटकरपाडा या उपकेंद्राचा अंतर्भाव आहे.
दांडी प्रा.आ. केंद्रापासून हे अंतर सुमारे बारा किमी आहे. एवढ्या दूर अंतरावरील दोन्ही प्रा.आ. केंद्रांना बोईसरसारख्या अवाढव्य तसेच दाट लोकवस्ती असलेल्या नागरिकांना आरोग्य सेवा पुरवावी लागते. यामध्ये एक संतापजन्य प्रकार म्हणजे दांडी प्रा.आ. केंद्राच्या अंतर्गत येणारे काटकरपाडा हे उपकेंद्र मंजूर असून जागेअभावी ते अंगणवाडी आणि सेवाश्रम शाळेतून चालविले जात आहे. यामुळे रुग्ण आणि गर्भवतींची प्रचंड हेळसांड होते आहे. याकडे लक्ष देण्यास लोकप्रतिनिधींना मात्र सवड मिळत नाही.
असंख्य वसाहती, केंद्र एकच
बोईसर व लगतच्या गाव, पाडे, नगरांचा विचार केल्यास भीमनगर, रूपरजननगर, दलाल टॉवर, सिडको, विजयनगर खैरापाडा (गावठाण भाग), वडारवाडा रावतेपाडा, धोडी पूजा, संजयनगर, दांडीपाडा (एक गावठाण), काठेपाडा, मंगलमूर्तीनगर, भंडारवाडा, सेवाश्रम परिसर, गणेशनगर, रामचंद्रनगर, रेणूनगर, साईनगर, केशवनगर, लोखंडीपाडा, न्यू दांडीवाडा, सुतारपाडा, दत्तवाडी, राऊतवाडी, सिद्धार्थनगर, संतोषीनगर, रहमतनगर, दुर्गानगर, आदर्शनगर, आनंदीनगर, धनानीनगर, कृष्णानगर, यादवनगर, ड्रीम सिटी, महावीरनगर, काटकरपाडा, थैयापाडा, सालवड, पास्थळ, शिगाव, हनुमाननगर, सरावली, बोईसर पूर्व, विद्यानगर इ. अनेक विस्तीर्ण नागरी वसाहतींचा बोईसर परिसरात अंतर्भाव आहे.