एमआयडीसी निवासी भागात पथदिव्यांची दुर्दशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 05:06 AM2021-05-05T05:06:49+5:302021-05-05T05:06:49+5:30
डोंबिवली : एमआयडीसी निवासी भागात खड्ड्यांमुळे रस्त्यांची वाताहत झाली असताना येथील पथदिव्यांचीही दुर्दशा झाली आहे. बल्ब युनिट तुटून लोंबकळत ...
डोंबिवली : एमआयडीसी निवासी भागात खड्ड्यांमुळे रस्त्यांची वाताहत झाली असताना येथील पथदिव्यांचीही दुर्दशा झाली आहे. बल्ब युनिट तुटून लोंबकळत आहेत तर लोखंडी खांब बल्बविना उभे असल्याचे चित्र दिसत आहे. काही ठिकाणी झाडांच्या फांद्याही पथदिव्यांच्या आड येत असल्याने दिवे चालू असूनही रस्त्यावर अंधार पडत आहे.
निवासी भागात रस्त्यांच्या बाजूला गटारी बनविण्याची कामे चालू आहेत तर काही भागात जलवाहिनी टाकण्याची कामे चालू आहेत. धिम्या गतीने सुरू असलेल्या या कामांमुळे खड्डे आणि मातीच्या ढिगाऱ्यांचे चित्र दिसत आहे. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन असल्याने रस्त्यावर वाहतूक व नागरिकांचा वावर मर्यादित आहे. त्यामुळे रात्री वर्दळ नसते. प्रचिती सर्विस रोड, मॉडेल कॉलेज परिसर, मिलापनगर, सुदर्शननगरमध्ये शांततेची स्थिती असते. नादुरुस्त आणि बंद अवस्थेतील पथदिवे पाहता याचा फायदा चोरटे उठवत असल्याचे काही दिवसांत घडलेल्या घरफोडीच्या घटनांतून स्पष्ट होते. निवासी भागात अनेक मोठी रुग्णालये आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका ये-जा करीत असतात. एकूणच परिस्थिती पाहता पथदिवे सुस्थितीत असणे गरजेचे असल्याकडे स्थानिक रहिवाशांनी लक्ष वेधले आहे. निवासी भागातील नादुरुस्त पथदिव्यांबद्दल तक्रारी सामाजिक माध्यमाद्वारे केडीएमसी, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे केल्या जातात. त्याची दखलही घेतली जाते. मात्र, काही दिवसांतच पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ पाहायला मिळते. सध्या केडीएमसीच्या हद्दीत स्मार्टसिटी अंतर्गत जुन्या पथदिव्यांच्या जागी नवीन पथदिवे उभे केले जात आहेत. निवासी भागातही मनपाने लक्ष द्यावे, अशी मागणी रहिवासी करीत आहेत.
पथदिव्यांची नव्याने जाेडणी आवश्यक
गटारांची बांधणी, जलवाहिनी टाकणे, महानगर गॅस वाहिनीच्या कामांसह अन्य कामांमुळे चालू असलेल्या खोदकामांमध्ये पथदिव्यांच्या वाहिन्यांत बिघाड होत असल्यामुळे ही परिस्थिती वारंवार ओढावत आहे. तसेच संबंधित वाहिन्या ३० वर्षांपेक्षा अधिक काळ जुन्या झाल्याने त्या पूर्णपणे बदलून नवीन टाकणे अत्यावश्यक असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
------------------------------------------------------
फोटो आहे.