मोक्याच्या भूखंडांची खिरापत, ठामपा प्रशासनाचा घाट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2019 01:07 AM2019-07-19T01:07:58+5:302019-07-19T01:08:05+5:30

आधीच एक रुपया नाममात्र दरात भूखंड देण्याच्या मुद्यावरून ठाणे महापालिकेत काही वर्षांपूर्वी रान पेटले असताना आता शहरातील मोक्याचे भूखंड शैक्षणिक संस्थांसह इतर संस्थांना देण्याचा सपाटाच पालिकेने लावल्याचे समोर येत आहे.

The plot of the important plots, the administration of the Thampa administration | मोक्याच्या भूखंडांची खिरापत, ठामपा प्रशासनाचा घाट

मोक्याच्या भूखंडांची खिरापत, ठामपा प्रशासनाचा घाट

Next

ठाणे : आधीच एक रुपया नाममात्र दरात भूखंड देण्याच्या मुद्यावरून ठाणे महापालिकेत काही वर्षांपूर्वी रान पेटले असताना आता शहरातील मोक्याचे भूखंड शैक्षणिक संस्थांसह इतर संस्थांना देण्याचा सपाटाच पालिकेने लावल्याचे समोर येत आहे. आधीच शहरातील मोक्याचे भूखंड शैक्षणिक संस्थांना दिले असताना आता नव्याने त्यांची खिरापत वाटण्याचा मुद्दा पेटणार असून पालिकेने अचानक घातलेल्या लोटांगणामुळे सारेच आश्चर्य व्यक्त करत आहेत. भूखंडवाटपाच्या या खिरापतीस सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीसह विरोधी पक्ष असलेले काँगे्रस-राष्ट्रवादी हे पक्ष विरोध करतात की नांगी टाकतात, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.
नव्या प्रस्तावानुसार कलाविषयक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी जॉइंट व्हेंचरचा आधार घेऊन, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठास सुविधा भूखंड, डोळ्यांच्या रुग्णालयासाठी बड्या खाजगी रुग्णालयाला भूखंडवाटप, टाटा हॉस्पिटलसाठी प्रतिवर्षी एक रुपया दराने बांधकामसहित भूखंड देणे, इस्कॉन या संस्थेलासुद्धा जॉइंट व्हेंचरमध्ये भूखंडाची खैरात वाटण्याचे धोरण पालिकेने आखल्याचे शुक्रवारी महासभेत आणलेल्या प्रस्तावावरून दिसत आहे.
यापूर्वी ठाणे महापालिकेने विविध शिक्षण संस्था ठाण्यात याव्यात, यासाठी शहरातील मोक्याचे भूखंड नाममात्र दराने दिले आहेत. यामध्ये ठाण्यातील काही बड्या राजकीय मंडळींचा हिस्सा असल्याचा आरोपही त्यावेळेस झाला होता. परंतु, यामध्ये स्वस्त दरात अगदी झोपडपट्टी भागातील विद्यार्थ्यांनाही चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळेल, असा दावा केला होता. आता यातील काही संस्था सुरूझाल्या असून त्यांचा खर्च हा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. हा अनुभव गाठीशी असतानाही आता नव्याने भूखंडाचे श्रीखंड खाजगी संस्थांना देण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे.
यानुसार, नरसी मोनजी इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडीजसाठी सुविधा भूखंड दिला जाणार आहे. महापालिकेसोबत जॉइंट व्हेंचरनुसार ३० वर्षांच्या कालावधीसाठी चार एकरांचा भूखंड दिला जाणार आहे. तर, या संस्थेमध्ये महापालिका क्षेत्रातील १५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी असलेला विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के कोटा राखीव ठेवला जाईल, असे म्हटले आहे. परंतु, यापूर्वीसुद्धा असेच काही नियम, अटी घालून इतर संस्थांनाही मोक्याच्या जागा दिल्या आहेत. मात्र, त्यांचे पालन या संस्थांकडून झालेले नाही. त्यामुळे आता या नव्या अटींचे पालन होईल का, अशी शंका उपस्थित होत आहे.
।टाटा रूग्णालय सुरू करण्यासाठी ठामपाच्या हालचाली
रचना संसद या संस्थेलासुद्धा कलाविषयक अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी जॉइंट व्हेंचरच्या धर्तीवर दोन एकरांचा भूखंड ३० वर्षांसाठी दिला जाणार आहे. या संस्थेच्या माध्यमातून आर्किटेक्चर, इंटिरिअर डिझाइन, अप्लाइड आर्ट्स आदी विषय शिकवले जाणार आहेत. कोलशेत रोड येथे विकास प्रस्तावांतर्गत प्राप्त बांधीव सुविधा इस्कॉन या संस्थेसही ४६३.८१ चौरस मीटर क्षेत्राची बांधीव सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या संस्थेसही ३० वर्षांसाठी हा भूखंड दिला जाणार आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्टÑ मुक्त विद्यापीठासही ठाणे केंद्र स्थापन करण्यासाठी १५०० चौरस मीटर क्षेत्राचा भूखंड शैक्षणिक प्रयोजनार्थ एक रुपया नाममात्र वार्षिक भुईभाडे दराने देण्याचा घाट घातला जात आहे.
तब्बल ३० वर्षे भाडेपट्ट्यावर तो दिला जाणार आहे. दुसरीकडे संकरा नेत्रालयाने जाचक अटींमुळे नेत्रालय सुरूकरण्यास नकार दिल्यानंतर आता तोच भूखंड ठाण्यातील एका बड्या खाजगी रुग्णालयासाठी दिला जाणार आहे.यामध्येही पालिकेने काही नियम, अटी घातल्या आहेत. परंतु, यापूर्वीच या बड्या रुग्णालयाला ठाण्यात रुग्णालय सुरू करताना अशाच प्रकारे नियम, अटी घातल्या होत्या. परंतु, त्या सर्वच या संस्थेने पायदळी तुडवल्या आहेत. त्यामुळे नेत्रालयाच्या बाबतीत या नियम, अटींची पूर्तता होणार का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
कॅन्सर रुग्णांसाठी आता ठाण्यात टाटा रुग्णालय सुरू करण्यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. एक रुपया नाममात्र भाडे आकारून तब्बल ३० वर्षे घोडबंदर भागात यासाठी जागा दिली जाणार आहे. विशेष म्हणजे अर्थसंकल्पात १० कोटींची तरतूदही केली जाणार आहे.

Web Title: The plot of the important plots, the administration of the Thampa administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.