शेअर रिक्षांकडून सर्वत्रच प्रवाशांची लूटमार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 01:12 AM2019-11-13T01:12:39+5:302019-11-13T01:12:42+5:30
रामनगर येथील स्टॅण्डवरून राजाजी पथ, म्हात्रेनगर, तुकारामनगर येथे शेअर पद्धतीने जाण्यासाठी पहिल्या टप्प्यासाठी अधिकृत आठ रुपये भाडे आहे.
अनिकेत घमंडी
डोंबिवली : केळकर रिक्षास्टॅण्डवरच नव्हे तर रामनगर येथील स्टॅण्डवरून राजाजी पथ, म्हात्रेनगर, तुकारामनगर येथे शेअर पद्धतीने जाण्यासाठी पहिल्या टप्प्यासाठी अधिकृत आठ रुपये भाडे आहे. मात्र, आरटीओ नियमांची पायमल्ली करून सर्रास १० रुपये आकारले जात आहेत. ‘प्रोटेस्ट अगेन्स्ट आॅटोवाला’ या प्रवासी संघटनेचे सदस्य प्रसाद आपटे यांनी त्यासंदर्भात स्टिंग आॅपरेशन करून थेट व्हिडीओ व्हायरल केला. यानंतरही आरटीओ अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतल्यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
‘हॅलो ठाणे’मध्ये रविवारी वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांनी शहरातील अन्य स्टॅण्डवर सुरू असलेली लूट उघड करण्यासाठी स्टिंग आॅपरेशन केले. रामनगर येथे चार रिक्षाचालकांना राजाजी पथ, म्हात्रेनगर येथे जाण्यासाठी किती भाडे द्यायचे अशी त्यांनी विचारणा केली. त्यातील एका रिक्षाचालकाने आठ रुपये भाडे आहे, मात्र दहा रुपये घेत असल्याचे सांगितले. इतर रिक्षाचालकांनी दहाच रुपये भाडे असल्याचे सांगितले. त्यामुळे सर्वच ठिकाणी प्रवाशांची रिक्षाचालकांकडून लूट होत असल्याचे निदर्शनास आले. आरटीओकडून कारवाई होत नसल्यामुळेच प्रवाशांना दोन रुपयांचा नाहक भुर्दंड सोसावा लागत असून दिवसभरात हजारो रुपये उकळले जात आहेत.
आरटीओने ठिकठिकाणी फलक लावून पहिल्या टप्प्याचे ८ रुपये भाडे असल्याचे नमूद केले आहे. पण, तरीही प्रवाशांकडून थेट १० रुपये आकारले जात असल्याची गंभीर बाब सातत्याने निदर्शनास येत आहे. याबाबत आरटीओने पावले उचलण्याची मागणी करण्यात येत आहे. प्रोटेस्ट अगेन्स्ट आॅटोवालातर्फे सोशल मीडियावरील व्हाट्सअॅप ग्रुपवर काही रिक्षाचालकांच्या मनमानी कारभाराची खुली चर्चा झाली.
आरटीओ अधिकाऱ्यांना यासंदर्भात प्रवाशांनीच तक्रारी कराव्यात, असेही जाहीर आवाहन गु्रपद्वारे करण्यात आले. प्रवाशांनी सुटे आठ रुपये द्यावेत. १० रुपये दिल्यास दोन रुपयांची विचारणा केली तर काही रिक्षाचालक ते परत देतात, पण विचारलेच नाही तर पैसे परत मिळत नाहीत, असे प्रवाशांनी सांगितले. त्यामुळे प्रवाशांनीच सुटे आठ रुपये द्यावेत, असे आवाहन रिक्षा युनियनच्या पदाधिकाºयांनी केले. तसेच जे जास्त भाडे नियमबाह्य आकारतात, त्यांची तत्काळ आरटीओ, ट्रॅफिक पोलिसांना तक्रार करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
>अखेर तो नियमबाह्य बोर्ड काढला
केळकर रस्त्यावरील रिक्षास्टॅण्डवर आरटीओच्या परवानगीशिवाय शेअर पद्धतीने पहिल्या टप्प्यासाठी १० रुपये आकारण्यात येणार असल्याचा शनिवारी बोर्ड लावण्यात आला होता. त्यानुसार ‘डोंबिवलीकरांची लूट’ या मथळ्याखाली ‘हॅलो ठाणे’मध्ये रविवारी वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत आरटीओ अधिकारी संजय ससाणे यांनी रविवारी तातडीने संबंधितांना सूचना दिल्या. त्यानुसार सोमवारी त्या ठिकाणचा नियबाह्य बोर्ड काढल्याचे ससाणे यांनी सांगितले. बोर्ड काढल्यानंतरही तेथील काही रिक्षाचालक १० रुपयेच भाडे घेत असल्याने त्यांच्यावर कारवाई केली का? यावर त्यांनी कारवाई करण्यासाठी पथक जाणार असल्याचे सांगितले.