पाणी कपातीत टँकर चालकांचं चांगभल, ७०० रुपयांचा टँकर ४ ते ७ हजारांना, खाजगी टँकर चालकांकडून लूट
By अजित मांडके | Published: February 22, 2023 05:37 PM2023-02-22T17:37:39+5:302023-02-22T17:37:47+5:30
पालिकेकडून ७०० रुपयांना टँकर घेऊन तो रहिवाशांना तब्बल ४ ते ७ हजार रुपयांना विकला जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या स्वत:च्या योजनेतून पाणी पुरवठा करणाऱ्या एका मुख्य शुद्ध जलवाहिनीची वेगवेगळ्या सहा ठिकाणी गळती काढण्याचे काम सुरु झाल्याने या काळात शहराला स्वत:च्या योजनेतून ५० टक्केच पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे या काळात शहरात झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. परंतु त्याचा फटका ठाणेकरांना, खासकरुन घोडबंदर, समता नगर, वागळे, इस्टेट, वर्तकनगर, सिध्देश्वर, जेल तलाव आदींसह इतर भागांना बसल्याचे दिसून आले आहे. मात्र याचा फायदा खाजगी टँकर चालकांनी चांगलाच उचल्याचे दिसून आले आहे. मंगळवारी तब्बल ५० टँकरच्या फेऱ्या या भागात झाल्या आहेत. परंतु पालिकेकडून ७०० रुपयांना टँकर घेऊन तो रहिवाशांना तब्बल ४ ते ७ हजार रुपयांना विकला जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
ठाणे महापालिकेच्या वतीने चार दिवस पाणी कपात केली जात आहे. त्यानुसार झोनींग पध्दतीने पाण्याचे नियोजन आखण्यात आले आहे. त्याचा पहिला फटका हा घोडबंदर भागाला मंगळवारी बसल्याचे दिसून आले. मंगळवारी घोडबंदर भागात अनेक सोसायटींना टँकरने पाणी पुरवठा करावा लागल्याचे दिसून आले आहे. महापालिकेने काही ठिकाणी १२ तास तर काही ठिकाणी २४ तास अशा फरकाने पाणी पुरवठा करण्याचे निश्चित केले आहे. तसेच ज्या भागांना पाणी कपातीचा फटका बसला आहे, अशा भागांना महापालिकेकडील ९ टँकरच्या माध्यमातून मोफत पाणी दिले जात आहे. तसेच मंगळवार पासून खाजगी टँकरची देखील या पाणी कपातीमुळे चलती सुरु झाल्याचे दिसून आले.
मंगळवारी एका दिवसात टँकरच्या तब्बल ५० फेऱ्या शहराच्या विविध भागात झाल्याचे दिसून आले. यात महापालिकेच्या २७ तर खाजगी टँकरच्या २३ फेऱ्या झाल्या असल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली. परंतु खाजगी टँकर चालकांनी महापालिकेच्या वितरण व्यवस्थेवरुन उचलेल्या पाण्याचीच आकडेवारी आहे. परंतु विहिरी, बोअरवेल व इतर यंत्रणांकडून उचलेल्या पाण्याची आकडेवारी पालिकेकडे नाही.
एकूणच महापालिका खाजगी टँकर चालकांना एका टँकरमागे, ७०० रुपये आकारते. मात्र टँकर चालक सोसायटींना टँकर पुरवितांना त्यापोटी ४ ते सात हजार रुपये आकारत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एकूणच खाजगी टँकर चालकांकडून मंगळवार पासून ही लूटच सुरु झाल्याचे दिसत आहे. परंतु पाणी हवे असल्याने सोसायटी धारक देखील ते टँकर खरेदी करत आहेत. पण अशा प्रवृत्तींना लगाम कोण घालणार असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.