सत्ताधारी पक्षवाले भांडवलदारांच्या खिशात- न्या. कोळसे पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 12:07 AM2018-08-25T00:07:19+5:302018-08-25T00:08:13+5:30
सत्तेवर बसलेल्या लांडग्याना येत्या निवडणुकीत बाहेर फेकण्यासाठी देशभरातील दलित, आदिवासी, मुस्लिम समाजाने एकत्र येण्याची गरज असल्याचे मत निवृत्त न्यायाधीश बी. जे कोळसे पाटील यांनी पालघर मध्ये व्यक्त केले.
पालघर : उद्योगपती अदानी आणि अंबानी या भांडवलदारांच्या खिशात सध्या पंतप्रधान मोदी आणि अमित शहा असून सत्तेवर बसलेल्या लांडग्याना येत्या निवडणुकीत बाहेर फेकण्यासाठी देशभरातील दलित, आदिवासी, मुस्लिम समाजाने एकत्र येण्याची गरज असल्याचे मत निवृत्त न्यायाधीश बी. जे कोळसे पाटील यांनी पालघर मध्ये व्यक्त केले.
जनता दल (सेक्युलर) पालघर जिल्ह्याच्यावतीने राज्यातील शेतकरी व शेतमजुरांना पेन्शन मिळावे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष काळूराम धोदडे, जद चे प्रदेश उपाध्यक्ष मनवेल तुस्कानो, प्रभाकर नारकर, राजाराम म्हात्रे, सुभाष मोरे, विद्याधर ठाकूर, ज्योती बडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रसारमाध्यमांची गळचेपी या सरकारने चालविली असून भांडवलशाही व ब्राह्मणवादी व्यवस्थेत तुम्हाला कधीही न्याय मिळणार नाही. कारण पूर्वी प्रमाणे आता न्यायव्यवस्थाही आपली राहिली नसल्याची खंत त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त करीत देशातील ७७ टक्के गरीब लोक हेच देशाचे खरे मालक निवृत्ती न्यायमूर्ती पाटील यांनी सांगितले.
नोटबंदी भांडवलदारांसाठी
निवडून आलेला नेता आता आपल्याला भेटायला येतच नाही, कारण त्याला कळून चुकलंय की निवडणुकीच्या आदल्या रात्री मतदाराला पैसे वाटप केल्यास मते विकत घेता येतात असे, न्यायमूर्ती कोळसे-पाटील यांनी सांगितले.
मोदींनी केलेली नोटबंदी ही भांडवलदारांच्या हितासाठी केल्याचे सांगून ज्यांना शेतीतले काही कळत नाही अशा लोकांना निवडून दिल्याने शेतकऱ्यांच्या व्यथा त्यांना कश्या कळणार असा टोलाही त्यांनी लगावला.