ठाण्यात मेट्रोला जोडणार ‘पॉड टॅक्सी’ने

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 09:15 IST2025-03-01T09:14:49+5:302025-03-01T09:15:00+5:30

‘ठामपा’च्या माध्यमातून ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील कामांचा आढावा सरनाईक यांनी घेतला.

'Pod taxi' to connect to Metro in Thane | ठाण्यात मेट्रोला जोडणार ‘पॉड टॅक्सी’ने

ठाण्यात मेट्रोला जोडणार ‘पॉड टॅक्सी’ने

लोकमत न्यूज नेटवर्क 
ठाणे : अंतर्गत आणि मुख्य मेट्रोला जोडण्यासाठी घोडबंदर भागात ‘पॉड टॅक्सी’ची सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. शुक्रवारी ठाणे पालिकेच्या अरविंद पेंडसे सभागृहात यासंदर्भातील प्रकल्पाचे सादरीकरण परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासमोर करण्यात आले. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविला जाणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली. मीरा-भाईंदर पालिका हद्दीतही हा प्रकल्प राबविला जाणार आहे. यामुळे प्रवाशांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्याबरोबर वेळेची बचतही होणार असल्याचा दावा सरनाईक यांनी केला.

‘ठामपा’च्या माध्यमातून ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील कामांचा आढावा सरनाईक यांनी घेतला. यावेळी ‘पॉड टॅक्सी’चे सादरीकरण करण्यात आले. मुख्य मेट्रो आणि अंतर्गत मेट्रोचे शेवटचे स्टेशन हे घोडबंदर भागात येणार आहे; परंतु तेथपर्यंत पोहोचण्यासाठी पॉड टॅक्सीचा पर्याय पुढे आला आहे. ‘रोप-वे’प्रमाणे ही टॅक्सी चालवली जाणार आहे. पावसाळ्यात या भागात पाणी साचून होणाऱ्या कोंडीतून यामुळे सुटका होणार आहे. ही टॅक्सी हवेत तरंगत चालणार आहे. तिचा ताशी ६० ते ७० किमी एवढा वेग असणार आहे. यातून १६ प्रवासी जाऊ शकतात. 

‘रोप-वे’ किंवा ‘पॉड टॅक्सी’ 
एमएमआर क्षेत्रातही आता सर्वेक्षण केले जाणार आहे. ज्या ठिकाणी ‘रोप-वे’ शक्य असेल तेथे ‘रोप-वे’ आणि ज्या ठिकाणी ‘पॉड टॅक्सी’ शक्य असेल तेथे ती सेवा देण्यास प्राधान्य दिले जाईल. 
यासंदर्भातील निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीतही झाला आहे. त्यानुसार आता सर्वेक्षण करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचेही ते म्हणाले.

या ठिकाणी धावणार ‘पॉड टॅक्सी’ 
भाईंदर पाडा ते विहंग हिल या एक किमीच्या ४० मीटर रस्त्याच्या वरच्या भागातून ही टॅक्सी धावणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ही हवाई वाहतूक सुरू होणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली. 
यासाठी पालिका किंवा राज्य सरकारचा एकही रुपया खर्च होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय मीरा-भाईंदर पालिका हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते जीपी येथील ६० मीटर रस्त्यावरही चालविली जाणार आहे. 
इलेक्ट्रिकवर टॅक्सी धावणार आहे. यासाठी सिमेंटचे गर्डर असून, याचे व्हील आणि ट्रॅक हे स्टीलचे असतील, अशी माहिती संबंधित कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली.
 

Web Title: 'Pod taxi' to connect to Metro in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.