घोडबंदर भागात पॉड टॅक्सीने अंतर्गत आणि मुख्य मेट्रोला जोडले जाणार! ठाणे पालिकेत सादरीकरण
By अजित मांडके | Updated: February 28, 2025 16:48 IST2025-02-28T16:47:53+5:302025-02-28T16:48:07+5:30
प्रवाशांची होणार वाहतूक कोंडीतून सुटका आणि वेळेचीही होणार बचत

घोडबंदर भागात पॉड टॅक्सीने अंतर्गत आणि मुख्य मेट्रोला जोडले जाणार! ठाणे पालिकेत सादरीकरण
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: अंतर्गत आणि मुख्य मेट्रोला जोडण्यासाठी ठाण्यातील घोडबंदर भागात पॉड टॅक्सीची सेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. शुक्रवारी ठाणे महापालिकेच्या कै. अरविंद पेंडसे सभागृहात या संदर्भातील प्रकल्पाचे सादरीकरण परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या समोर करण्यात आले. प्रायोगिक तत्वावर म्हणून हा प्रकल्प राबविला जाणार असल्याची माहिती यावेळी सरनाईक यांनी दिली. तसेच मिराभाईंदर महापालिका हद्दीत देखील हा प्रकल्प राबविला जाणार असून यामुळे प्रवाशांना वाहतुक कोंडीतून सुटका होण्याबरोबर वेळेची बचही होणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघात सुरु असलेल्या कामांचा आढावा सरनाईक यांनी घेतला. यावेळी पॉड टॅक्सीचे सादरीकरण करण्यात आले. मुख्य मेट्रो आणि अंतर्गत मेट्रोचे शेवटचे स्टेशन हे घोडबंदर भागात येणार आहे. परंतु तिथपर्यंत पोहचण्यासाठी पॉड टॅक्सीचा पर्याय पुढे आणण्यात आला आहे. रोप वे प्रमाणे ही टॅक्सी चाललली जाणार असून पावसाळ्यात या भागात रस्त्यावर पाणी साचून होणाऱ्या वाहतूक कोंडीतून यामुळे सुटका होणार आहे. ही टॅक्सी हवेत तरंगती स्वरुपात चालणार आहे. तिचा ताशी ६० ते ७० किमी एवढा असणार आहे. यातून एकावेळेस उभे आणि बसून १६ प्रवासी जाऊ शकतात. ज्या प्रवाशांना ज्या स्थानकापर्यंत जायचे असेल त्याठिकाणीच ही टॅक्सी थांबणार आहे. संपूर्णपणे इलेक्ट्रीकवर ही टॅक्सी धावणार आहे. यासाठी सिमेंटचे गर्डर असणार असून याचे व्हिल आणि ट्रॅक हे स्टीलचे असणार असल्याची माहिती यावेळी संबधींत कंपनीच्या प्रतिनिधींनी दिली.
घोडबंदर भागातील याठिकाणी धावणार पॉड टॅक्सी
घोडबंदर भागातील भाईंदर पाडा ते विहंग हील या एक किमीच्या ४० मीटर रस्त्याच्या वरच्या भागातून ही टॅक्सी धावणार आहे. प्रायोगीक तत्वावर ही हवाई वाहतुक सुरु होणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली. यासाठी महापालिका किंवा राज्य शासनाचा एकही रुपया खर्च होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचा फायदा मुख्य मेट्रो आणि अंतर्गत मेट्रो पर्यंत जाणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. याशिवाय मिरा भाईंदर महापालिका हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा ते जीपी येथील ६० मीटर रस्त्यावर चालविली जाणार आहे.
एमएमआर क्षेत्रात रोपवे किंवा पॉड टॅक्सी
एमएमआर क्षेत्रातही आता सर्व्हे केला जाणार असून ज्याठिकाणी रोप वे शक्य असेल त्याठिकाणी रोपवे आणि ज्या ठिकाणी पॉड टॅक्सी शक्य असेल त्याठिकाणी ती सेवा देण्याला प्राधान्य दिले. या संदर्भातील निर्णय मंत्री मंडळाच्या बैठकीत देखील झाला असून त्यानुसार आता सर्व्हे करुन पुढील निर्णय घेतला जात असल्याचेही ते म्हणाले.