‘अंतरंग’मधील कविता सकारात्मक वृत्तीने भारलेली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:43 AM2021-08-23T04:43:09+5:302021-08-23T04:43:09+5:30
डोंबिवली : अंतरंग काव्यसंग्रहातील कविता सकारात्मक वृत्तीने भारलेली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, कवी व गीतकार प्रा. प्रवीण ...
डोंबिवली : अंतरंग काव्यसंग्रहातील कविता सकारात्मक वृत्तीने भारलेली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, कवी व गीतकार प्रा. प्रवीण दवणे यांनी केले. इशा कुलकर्णी यांच्या कवितासंग्रहाचे प्रकाशन प्रा. प्रवीण दवणे व कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते चिंतामणी हॉलमध्ये शनिवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते.
मनाच्या अबोध कप्प्यात जपलेले अनेक क्षण जीवनाला जिवलग सोबत देत असतात. पुष्कळदा त्या क्षणांकडे लक्ष द्यायला व्यवहारी व्यग्रतेत वेळ मिळत नाही. पण आयुष्याचे एक वळण असे येते, ज्या वळणावर आयुष्याचे संचित व्यक्त करावेसे वाटते. ‘अंतरंग’ काव्यसंग्रहातून अशाच सहजसंवादी सुबोध कविता कवयित्री इशा कुलकर्णी यांनी रसिकांसाठी आणल्या आहेत, असे प्रा. दवणे म्हणाले. यावेळी पवार यांनी त्यांच्या मनोगतात कुलकर्णी यांच्या कविता संग्रहात बाल-किशोरांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंतचे संवेदनशील भावविश्व असल्याचे सांगून त्यांना शुभेच्छा दिल्या.
कविता संग्रहाविषयी इशा कुलकर्णी म्हणाल्या की, ‘अंतरंग’ काव्यसंग्रहात मानवी भावभावनांचे मनोहारी चित्रण आहे. आनंद, दुःख, विरह, प्रेम, मानवता, चैतन्य अशा संमिश्र भावनांनी भरलेला हा काव्यसंग्रह आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मोनिका पापरीकर यांनी, तर आभार साईश कुलकर्णी यांनी मानले.