कवीच्या वयाबरोबर कवितादेखील वाढली पाहिजे : अशोक बागवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:14 PM2019-06-10T23:14:26+5:302019-06-10T23:14:57+5:30
सहयोग मंदिरमध्ये कवयित्री सुजाता राऊत यांच्या ‘उगमाकडे जाताना’ या पहिल्या कवितासंग्रहाचे तसेच कवी गीतेश शिंदे
ठाणे : रंग जेव्हा बोलतो तेव्हा चित्र निर्माण होते आणि शब्द जेव्हा अबोल होतो, तेव्हा कविता निर्माण होते. कवी वयाने वाढतो तशी कवितादेखील वाढली पाहिजे, असे मत ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांनी व्यक्त केले.
सहयोग मंदिरमध्ये कवयित्री सुजाता राऊत यांच्या ‘उगमाकडे जाताना’ या पहिल्या कवितासंग्रहाचे तसेच कवी गीतेश शिंदे यांच्या ‘निमित्तमात्र’ या कवितासंग्रहाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन रविवारी करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात बागवे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या लेखिका डॉ. वीणा सानेकर यांनी या दोन्ही कवींच्या लेखनप्रवासावर आपले विचार व्यक्त केले. प्रकाशक नितीन हिरवे यावेळी उपस्थित होते. ‘उगमाकडे जाताना’ या संग्रहाचे मुखपृष्ठ साकारणारे, कार्यक्र माचे अतिथी रामदास खरे यांनी चित्रकलेच्या प्रवासाबद्दल, मुखपृष्ठाच्या निर्मितीबद्दल विवेचन केले. यावेळी राऊत म्हणाल्या, ‘शाळेच्या पाठपुस्तकात कवयित्री इंदिरा संत यांच्या ‘बाहुली’ या कवितेने माझे भावविश्व तरल केले, समृद्ध केले. त्या कवितेत व्यक्त झालेल्या भावनांचा कल्लोळ अस्वस्थ करून गेला. जुन्यानव्या कवितांच्या अखंड वाचनाने मी समृद्ध झाले. ज्येष्ठ कवयित्री अरु णा ढेरे यांच्या भावस्पर्शी आणि निर्मळ कवितांचा परिचय पुढे कॉलेजजीवनात झाला. त्यांच्या कवितेने एक प्रकारचा समंजसपणा दिला. आयुष्याच्या खडतर टप्प्यांवर कवितेनेच मला तारले.’ याच सोहळ्यानंतर ‘अक्षय रजनी’ या कवितालेखन स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. यात एकूण १८४ स्पर्धकांनी भाग घेतला. विजय जोशी (डोंबिवली), रजनी निकाळजे (मीरा रोड), संकेत म्हात्रे (ठाणे), वर्षा गटणे (ठाणे), रवींद्र मालुंजकर (नाशिक), उत्तेजनार्थमध्ये मानसी चापेकर (रोहा), जुई जोशी (मेलबर्न), अलका कुलकर्णी (नाशिक), तर विशेष उल्लेखनीयमध्ये कुमार नंदन कार्ले (डोंबिवली) या नऊ विजेत्या कवींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्र माचे सूत्रसंचालन कवी गीतेश शिंदे यांनी, तर आभारप्रदर्शन तपस्या नेवे यांनी केले.