ठाण्यातील शिरीष पै कट्ट्यावर सादर झाल्या स्वरचित कविता, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2018 04:08 PM2018-07-09T16:08:08+5:302018-07-09T16:15:27+5:30
उद्वेली बुक्स व शांता वसंत पटवर्धन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिरीष पै कट्ट्यावर स्वरचित कवितांचा पाऊस पडला.
ठाणे: विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच कवींनी आपल्या स्वरचित कविता शिरीष पै कट्ट्यावर सादर केल्या. ऐन पावसाळ््यात या कवितांचा पाऊस देखील ठाणेकरांनी अनुभवला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. विनोद इंगळहळीकर यांनी कविता लिहीताना प्रतिभा व त्याचे तंत्र माहित असावे असे सांगून मार्गदर्शन केले.
डॉ. इंगळहळीकर पुढे म्हणाले की, प्रत्येकाच्या मनात काही ना काही असते. कोणत्याही कविता, लिखाणाचा उद्देश हा आपल्या मनातील विचार समोरच्याच्या मनात जावे. आपल्या मनातील भाव समोरच्याच्या मनात निर्माण व्हावे. हे यशस्वी करण्यासाठी आपले लिखाण हे मोघम असू नये तर ते स्पष्ट, स्वच्छ तसेच, दुसऱ्याला कळेल असे असावे. आपल्याला नेमके काय म्हणायचे हे कवितेत उतरले पाहिजे. विचार सुसुत्र असावे. आपण कोणत्याही शब्दांच्या प्रेमात पडतो आणि तो वापरायचा म्हणून वापरतो, तसे होता कामा नये असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला. विवेक मेहेत्रे यांनी त्यांचे स्वागत व परिचय करुन दिला. चिन्मय उमाटकर या विद्यार्थ्याने सादर केलेल्या मैत्री या कवितेने कट्ट्याची सुरूवात झाली. त्यानंतर साक्षी कदम हिने विरह, संजय भट यांनी ससा, माधुरी जोग यांनी ‘इमानाची स्पर्धा’, अदिती भिलारे हिने ‘धरती’, विकास भावे यांनी पावसाळ््यात बहरलेल्या निसर्गावर ‘वारा सुटला, ढग ही आले’, डॉ. मारुती नलावडे यांनी ‘का झाली नकोशी’, मनमोहन रेगे यांनी ‘स्वगेर्ची अमृतधारा’ ही मालवणी कविता, यशवंत दीडवाघ याने ‘माती’, राजनीश सोनावणे हिने ‘होय होय मी स्भी भ्रुण बोलतेय’, उत्तम खडसे यांमी ‘माय भगिनी’ अशा अनेक कविता सादर झाल्या. डॉ. सतिश कानविंदे यांनी ‘शेण म्हणजे शेण असतं’, साक्षी कांबळे हीने ‘आयुष्य’, समिक्षा थिटे हिने ‘तिच्या कविता’, विकास वायकूळ यांनी ‘आठवण पावसाची’, रविंद्र कारेकर यांनी प्रेम, विरह, पाऊस या विषयांवरच्या हलक्या फुलक्या चारोळ््या, अनंत जोशी यांनी ‘ठरवलंय आता’ या कवितांना वाह वाह, क्या बातची दाद दिली. विशेष दाद देऊन गेल्या त्या डॉ. र. म. शेजवलकर यांची आडनावावरच्या विसंगतीवर आधारीत कविता आणि विवेक मेहेत्रे यांची डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यावर आधारीत ‘वचन आमचे’ या कविता. दरम्यान, डॉ. सुधीर मोंडकर यांनी साधी कवितेपेक्षा बालकविता लिहीणे कठिण असते असे सांगत फुलपाखरु छान किती दिसते ही बालकविता ऐकवली. डॉ. मोंडकर यांनी कार्यक्रमाची सुत्र सांभाळली.