कविता ही अंतर्मुख करून स्वतःकडे पाहायला शिकवते - महेश केळुस्कर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:45 AM2021-08-12T04:45:39+5:302021-08-12T04:45:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : कविता ही अंतर्मुख करून स्वतःकडे पाहायला शिकवते. आपल्या आतील बदल जाणवून ते व्यक्त करत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कविता ही अंतर्मुख करून स्वतःकडे पाहायला शिकवते. आपल्या आतील बदल जाणवून ते व्यक्त करत असते. कविता ही माणसाला परिपक्व करते, पण त्यासाठी काही काळ जावा लागतो, असे मत ज्येष्ठ कवी डाॅ. महेश केळुस्कर यांनी व्यक्त केले.
ठाण्यातील सृजनसंवाद प्रकाशित आणि निर्मला आलेगावी-कुप्पस्त लिखित ‘व्यक्त’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवारी सायंकाळी पार पडला. फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून हा सोहळा झाला. डॉ. महेश केळुस्कर, प्रा. प्रतिभा सराफ, सृजनसंवाद प्रकाशनाचे संपादक गीतेश शिंदे, प्रकाशिका सोनाली गजानन शिंदे प्रमुख उपस्थित होते. यादरम्यान केळुस्कर बोलत होते.
‘कोणत्याही कवितेला स्त्रीवादी किंवा विशिष्ट लेबल न लावता कविता म्हणूनच पाहिले पाहिजे. निर्मला या कवयित्री कवितेकडे आर्त विनवणी करते आहे व कवितेची साथ, सोबत घेऊन पुढे चालली आहे. त्यांची कविता पुरुष सत्तेविषयी बंड करते व अंतर्मुख होऊन स्त्रीत्वाची चिकित्सा करते’, असेही डॉ. केळुस्कर म्हणाले.
प्रमुख अतिथी प्रा. सराफ म्हणाल्या, ‘या पुस्तकातील बहुतेक कविता अलंकारांशिवाय आंतरिक सौंदर्याने नटलेल्या, साध्या पण सकस मुक्तछंदातील व अल्पाक्षरी आहेत. त्या निखळ काव्यानंद देतात. कवयित्रीचा हा पहिला कवितासंग्रह असला, तरी यात नवखेपणाच्या खुणा नाहीत तर नवेपणाच्या काव्य जाणिवा आहेत.’ तर सृजनसंवादचे संपादक गीतेश शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. निर्मला यांच्या कविता माझ्याकडे वाचनासाठी आल्या तेव्हा त्यातील आशय विखुरलेल्या स्वरूपात होता. त्यातून मला कसदार माती मिळाली, असे ते म्हणाले.
या कवितासंग्रहाला ज्येष्ठ कवी अशोक बागवे यांचा ब्लर्बरूपी आशीर्वाद लाभला आहे. तर मुखपृष्ठ अश्विनी खटावकर यांनी साकारले आहे.