रेल्वेच्या पॉइंट्समनने वाचवले अंध महिलेच्या मुलाचे प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 06:18 AM2021-04-20T06:18:42+5:302021-04-20T06:18:54+5:30
वांगणी स्थानकात काळजाचा ठाेका चुकवणारा थरार
लोकमत न्यूज नेटवर्क
बदलापूर/मुंबई : अंध आईसोबत फलाटावरून चालताना सहा वर्षांचा मुलगा रेल्वे ट्रॅकवर पडतो... त्याचवेळी समोरून वेगाने एक्स्प्रेस धडधडत येते, गोंधळलेल्या मुलाला ट्रॅकवरून बाजूला होण्याचेही सुचत नाही. काही क्षणांत हा मुलगा ट्रेनखाली चिरडला जाणार असे दिसत असतानाच एक जिगरबाज रेल्वे कर्मचारी धावत येऊन सुपरमॅनसारखा त्या मुलाला सुखरूप वाचवतो. अवघ्या काही सेकंदात तो मुलगाही वाचतो आणि तो जिगरबाज पॉइंट्समनही. ही घटना वांगणी रेल्वे स्थानकात शनिवारी सायंकाळी घडली असून, अंगावर काटा आणणारे हे दृश्य सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
पॉइंट्समन मयूर शेळके यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. लोकलमध्ये लहानसहान वस्तू विकणारी संगीता शिरसाट ही अंध महिला मुलासोबत वांगणी स्थानकात फलाटावर चालताना अंदाज न आल्याने अगदी कडेला गेली आणि तिचा मुलगा साहिल रुळावर पडला. त्याचवेळी कर्जतहून मुंबईकडे भरधाव वेगाने जाणारी उद्यान एक्स्प्रेस स्थानकात शिरली. हॉर्न ऐकून संगीता यांनी मदतीसाठी आक्रोश केला. तो ऐकताच मयूर शेळके यांनी क्षणाचाही विलंब न लावता रुळावरून धावत मुलाला फलाटावर ढकलले आणि स्वतःही कसेबसे फलाटावर चढले. अवघ्या काही सेकंदांचा हा खेळ सर्वांच्या हृदयाचा थरकाप उडवणारा ठरला. यावेळी त्यांच्यापासून उद्यान एक्स्प्रेस अवघ्या काही फुटांवरच होती. या थरारक घटनेबद्दल रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करीत मयूर यांच्या धाडसाचे कौतुक केले. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल, मुंबई विभागाचे रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल यांनी शेळके यांना पुरस्कार जाहीर केले. मध्य रेल्वेने शेळके यांचा सत्कारही केला. माझ्या मुलाला वाचवणाऱ्या मयूर शेळके यांच्यात मला देव दिसला. मी आंधळी असले तरी मला हा थरार न बघताही अनुभवता आला. त्यामुळे त्यांना पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी संगीता शिरसाट यांनी सरकारकडे केली आहे.
मयूर शेळके यांचा ‘लोकमत’तर्फे गौरव
या धाडसाबद्दल ‘लोकमत’ कडूनही मयूर सखाराम शेळके यांचा सीएसएमटी येथे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
त्या मातेचा आक्रोश कानी पडला तेव्हा केवळ मुलाला वाचविणे हेच माझ्या मनात होते. त्यामुळे या घटनेत आपल्या जिवाचे बरेवाईट होईल याची चिंता मनात बिलकूल नव्हती. एका अंध मातेच्या मुलाला वाचविल्याचे समाधान मिळाले आणि आनंद झाला.
- मयूर शेळके, रेल्वे पॉइंट्समन