क्षणभर मलाही भीती वाटली, पण...; भरधाव ट्रेनसमोरून चिमुकल्याला वाचवणाऱ्या जिगरबाज तरुणानं सांगितला थरार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 01:31 PM2021-04-19T13:31:54+5:302021-04-19T13:33:04+5:30
अवघ्या सेकंदानं मृत्यूला हुलकावणी; रेल्वे कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे, धाडसामुळे चिमुकला वाचला
अंबरनाथ: रेल्वेच्या पॉइंटमनने प्रसंगावधान दाखवत चिमुकल्याचे प्राण वाचवले. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. मध्य रेल्वेच्या वांगणी स्थानकावरील ही घटना आहे. पॉइंटमनने दाखवलेल्या सतर्कतेमुळे मुलाचा जीव वाचवला. विशेष म्हणजे अवघ्या काही सेकंदांनी मुलाचा जीव वाचला. पॉइंटमननं स्वत:चा जीव धोक्यात घालून मुलाचा जीव वाचवला. त्यांच्या या धाडसाचं अधिकाऱ्यांपासून रेल्वे मंत्र्यांपर्यंत सर्वांनी कौतुक केलं आहे.
रेल्वेचे पॉइंटमन मयूर शेळके यांनी दाखवलेल्या हिमतीचा अभिमान वाटत असल्याचं ट्विट रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी केलं आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून चिमुकल्याचे प्राण वाचवणाऱ्या शेळके यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दोन दिवसांपूर्वी घडलेला संपूर्ण थरार सांगितला. 'शनिवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास उद्यान एक्स्प्रेस मुंबईच्या दिशेनं निघाली होती. त्यावेळी मी ड्युटीवर होतो. त्यावेळी एक अंध महिला तिच्या मुलीला घेऊन फलाटावरून चालत होती. तिच्या नकळत तो मुलगा फलाटावरून खाली पडला. त्यावेळी समोरून एक्स्प्रेस येत होती. मुलाला वाचवणं गरजेचं आहे असा निर्धार मी मनाशी केला आणि जिवाची बाजी लावली. त्यानंतर मी लगेचच मुलाच्या दिशेनं धावत सुटलो,' असं शेळके यांनी सांगितलं.
तुमच्या धैर्याला, तत्परतेला सलाम! पॉईंटमन मयूर शेळके यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवले लहान मुलाचे प्राण; वांगणी रेल्वे स्थानकातील घटना https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/s99PExnqvo
— Lokmat (@MiLOKMAT) April 19, 2021
समोरून येणारी एक्स्प्रेस पाहून मला भीती वाटली होती. पण त्या मुलाला वाचवायचंच असा निश्चय मी केला होता आणि त्याला वाचवण्यात यशस्वी ठरलो, अशा शब्दांत शेळकेंनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. सध्या सर्वांकडून माझ्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सगळे माझ्या हिमतीला दाद देत आहेत. हे पाहून आनंद वाटत असल्याचं शेळके म्हणाले.
तुम्ही मुलाला सुखरुप वाचवलं त्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं आहे. तुम्ही ते पाहिलं का, असा प्रश्न शेळके यांना विचारण्यात आला. त्यावर मी ते सीसीटीव्ही फुटेज पाहिलं. तो प्रसंग अतिशय चित्तथरारक आहे. त्यावेळी तो मुलगा माझ्यापासून ५० ते ६० मीटर अंतरावर होता. मी त्याच्यापर्यंत धावत पोहोचलो. त्याला उचलून फलाटावर ठेवलं आणि नंतर मीदेखील लगेच फलाटावर उडी घेतली. त्यानंतर दोन सेकंदात तिथून गाडी गेली, अशा शब्दांत शेळकेंनी घडलेला थरारक प्रसंग सांगितला.