धार्मिक कार्यक्रमांत भिवंडीतील मदरसातील ३० विद्यार्थ्यांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 01:40 AM2018-01-18T01:40:21+5:302018-01-18T01:55:26+5:30
भिवंडी : शहरात दर्गारोड-रोशनबाग परिसरांतील धार्मिक कार्यक्रमांत काल मंगळवारी दुपारी जेवण करून आलेल्या मदारशातील ३० विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते.परंतू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना बुधवारी रात्री स्व.इंदिरागांधी स्मृती रूग्णालयांत प्राथमिक उपचार करून मुंबईतील नायर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले.
दर्गारोड-रोशनबाग भागात मेहबूब कंपाऊंडमध्ये उर्दु जमाती अव्वल माहिन्याच्या निमीत्ताने गैरवी की नियाज हा सार्वजनिक जेवणाचा कार्यक्रम आयोजीत केला होता.त्यासाठी तेथील मुख्तार अताऊल्ला शेख यांनी काल मंगळवार रोजी दिवानशहा येथील दारु ल ऊलुम मदरसातील बारा ते चौदा वयोगटातील तीस विद्यार्थ्यांना जेवणासाठी आमंत्रित केले होते. जेवणानंतर काल रात्री विद्यार्थ्यांना उलटी-मळमळ झाल्याने त्यांच्यावर स्थानिक डॉक्टरांमार्फत उपचार सुरू होते. परंतू त्यामधील पाच मुलांची प्रकृती गंभीर होऊन त्यांना आकडी येऊ लागल्याने घाबरलेल्या संस्थेच्या पदाधिकाºयांनी व समाजसेवी लोकांनी बुधवारी रात्री उशीरा एकुण ३० विद्यार्थ्यांपैकी २५ विद्यार्थ्यांना स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रु ग्णालयात दाखल केले. रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अनिल थोरात यांनी ताबडतोब सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू केले.परंतू त्यापैकी पाच विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारा करीता डॉक्टरांनी ठाण्यातील सामान्य रूग्णालयांत पाठविले.परंतू दारु ल ऊलुम मदरसा संचालकांनी उरलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ठाणे येथे पाठविण्याचा निर्णय घेतला. मात्र नंतर त्यांना घेऊन गेलेल्या रूग्णावाहिका परस्पर मुंबई येथील नायर रु ग्णालयात पाठविण्यात आल्या.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी डॉ संतोष थिटे, तहसीलदार शशिकांत गायकवाड, भाजपा शहराध्यक्ष संतोष शेट्टी, काँग्रेस शहराध्यक्ष शोएब खान गुड्डु व नगरसेवकांनी रु ग्णालयात धाव घेऊन घटनेची माहिती घेऊन सहकार्य केले.
या बाबत इंदिरागांधी रूग्णालयांचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.अनिल थोरात यांनी सांगीतले की,सदरच्या विद्यार्थ्यांनी खाल्लेल्या जेवणांत नासके तसेच बुरशीयुक्त अन्नपदार्थ वापरल्याची शक्यता आहे.त्यामधून बोटुलिझम पॉयझन प्रक्रि या होऊन विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवली आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना उलट्या,जुलाब,डोके दुखणे,ताप येणे व आकडी येणे असे आजार झाले आहेत. त्यामुळे २४ विद्यार्थ्यांना उपचारासाठी ठाणे सामान्य रूग्णालयांत पाठविले.तर एका विद्यार्थ्यावर इंदिरागांधी रूग्णालयांत उपचार सुरू आहेत.तर नागरिकांच्या सांगण्यानुसार इतर पाच जणांवर शहरातील खाजगी रूग्णालयांत उपचार सुरू आहेत. मात्र ऐनवेळी मदारशांच्या संचालकांनी ठाणे मार्गावर नेलेल्या विद्यार्थ्यांना मुंबईतील रूग्णालयांत नेण्याचा निर्णय कळविला. त्यामुळे सर्व मुले मुंबईतील रूग्णालयात रवाना झाली.
या घटनेने शहरात खळबळ माजली असुन या सार्वजनिक कार्यक्रमांत हजारो लोक जेवले असताना केवळ मदारशांमधील मुलांना ही विषबाधा कशी झाली? या बाबत विचारमंथन सुरू झाले असुन याचा शोध घेण्याचा प्रयत्न समाजसेवी लोक घेत आहेत. तसेच काही वर्षापुर्वी शहरातील धोबीतलाव येथे खाणावळीतील जेवणाने अन्न विषबाधा होऊन शेकडो कामगाराचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.