बोरीवलीत नारळांच्या झाडांवर विषप्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 02:39 AM2019-01-07T02:39:48+5:302019-01-07T02:40:17+5:30
वृक्ष प्राधिकरणाचे दुर्लक्ष : चार झाडांवर विषप्रयोग
मुंबई : बोरीवली पूर्वेकडील राजेंद्रनगरातील ओम साई सोसायटी येथील चार नारळांच्या झाडांवर विषप्रयोग झाला असून, झाडे सुकत चालली आहेत. झाडांच्या खोडाला ड्रिल करून, त्यात रासायनिक पदार्थ टाकून विषप्रयोग झाल्याची तक्रार कस्तुरबा पोलीस ठाण्यामध्ये नोंदविण्यात आली आहे. या प्रकरणात कित्येक दिवस उलटूनही वृक्ष प्राधिकरण किंवा उद्यान विभागाने दखल न घेतल्याने रहिवाशांकडून संताप व्यक्त होत आहे.
२५ डिसेंबर, २०१८च्या सायंकाळी तीन अज्ञात माणसे आली होती. जमिनीचा सर्व्हे करण्यासाठी आलो आहोत, असे त्या अज्ञात लोकांनी सांगितले. या वेळी त्यांनी आमच्या घरातून ड्रिल मशिनसाठी लागणारी वीज घेतली. त्यानंतर, झाडांना ड्रिल करायला सुरुवात केली. दरम्यान, ते तिघेही काही तरी चुकीचे करत असल्याचा संशय आला. त्यातली एक व्यक्ती चहूबाजूने नजर ठेवत होती. सायंकाळची वेळ झाल्यामुळे घराबाहेरची लाइट लावली. तेव्हा लाइट बंद करण्यासाठी तिघांतल्या एका व्यक्तीने सांगितले. त्याच्याकडे पिवळ्या रंगाचे रसायन होते. ते रसायन नारळाच्या झाडांच्या मुळाजवळ टाकत होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने सांगितली.
म्हाडाच्या भूखंडावर अशोक, आंबा, नारळ इत्यादी जुनी झाडे आहेत. याबाबत माजी नगरसेविका शिल्पा चोगले यांनी २६ डिसेंबर रोजी पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्रनगर येथील चार नारळ झाडांच्या मुळावर विषप्रयोग करण्यात आल्याची तक्रार नोंदविली आहे. शिल्पा चोगले या संदर्भात सांगतात की, महापालिकेकडे तक्रार करण्यात आली आहे. महापालिकेकडून तपास करण्यात दिरंगाई होत आहेत. झाडे अर्धी मेलेल्या स्थितीमध्ये आहेत. जमिनीचा सर्व्हे करण्याचे कारण देऊन तिघांनी झाडांवर ड्रिल मशिनने छिद्र पाडून विषप्रयोग केला आहे. संबंधित व्यक्तिवर कारवाई झाली पाहिजे.
‘झाडे बचाव’ आंदोलन
सरकारने पर्यावरण संरक्षणासाठी इतके कायदे व नियम तयार केले असून, राजेंद्रनगर येथील झाडांवर झालेल्या विष प्रयोगवर अद्याप महापालिका, पोलीस आणि उद्यान प्रशासनाकडून कारवाई झालेली नाही. गुन्हेगाराला शिक्षा झाली नाही, तर झाडांच्या हत्येचे सत्र काही थांबणार नाही. यासाठी सोमवारी, १० वाजता राजेंद्रनगर येथे झाडे बचाव आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती मिशन ग्रीन मुंबईचे संस्थापक शुभजीत मुखर्जी यांनी दिली.