विषारी भाज्यांनी लोकांचे आरोग्य आले धोक्यात
By admin | Published: January 11, 2017 07:08 AM2017-01-11T07:08:02+5:302017-01-11T07:08:02+5:30
डोंबिवली परिसरात रेल्वेमार्गालगत पिकवल्या जाणाऱ्या पालेभाज्यांसाठी नाल्यात सोडले जाणारे रासायनिक सांडपाणी वापरले जात आहे.
डोंबिवली : डोंबिवली परिसरात रेल्वेमार्गालगत पिकवल्या जाणाऱ्या पालेभाज्यांसाठी नाल्यात सोडले जाणारे रासायनिक सांडपाणी वापरले जात आहे. या भाज्या ताज्या म्हणून मिळत असल्या, तरी त्या मानवी आरोग्यास सर्वाधिक हानीकारक आहेत. त्या पिकविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. यावर कोणाचे नियंत्रण आहे की नाही, असा संतप्त सवाल मनसेने उपस्थित केला आहे.
यातील काही भाज्या पालिकेच्या हद्दीत तर काही रेल्वेच्या हद्दीत पिकवल्या जातात. त्यासाठी भाडेपट्ट्याने भूखंड दिले आहेत. मात्र त्यानंतर तेथे पिकवल्या जाणाऱ्या भाजीपाल्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. पालिका, रेल्वे त्याबाबत परस्परांकडे बोट दाखवते, असा आरोप मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी केला. कृषी विभागानेही त्याबाबत काहीही कारवाई केलेली नाही. याविरोधात पक्षातर्फे गेली पाच वर्षे दरवर्षी आंदोलन केले जाते. या विषारी भाज्यांची शेती उखडून टाकली जाते. एक दिवसाचे आंदोलन होते. त्यामुळे त्यावर स्टंटबाजीची टीका केली जाते. हा मुद्दा जनहिताचा आहे, या दृष्टीकोनातून त्याकडे पाहिले जात नाही. इतर राजकीय पक्षही त्यासाठी पुढे येत नाहीत, अशी खंत मांडली.
भाज्या पिकविणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी कोणतीही सरकारी यंत्रणा पुढे येत नाही. त्यांची कारवाईची इच्छा दिसत नाही. रेल्वेमार्गालगतच्या जागा रेल्वेने काही शेतकऱ्यांना भाडे तत्वावर दिल्या आहेत. या शेतीला बाजाराधिष्ठीत शेती असे संंबोधले जाते. पण त्याच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला जातो. रेल्वे ज्या शेतकऱ्याना ही जागा भाडे तत्वावर देते. ते स्वत: भाजीपाला न पिकविता परप्रांतीयांना भाड्याने देतात. ती मंडळी नाल्यातून पंपाद्वारे पाणी उचलून प्रदूषित सांडपाण्यावर भाजीपाला पिकवतात. तोच बाजारपेठेत विक्रीसाठी येतो. त्या भाज्या खाणाऱ्यांना अनेक आजार होतात. ते आजार जीवघेणे असतात. त्याकडे डोळेझाक केली जाते, असे म्हणणे त्यांनी मांडले.
डोंबिवली येथील सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरासमोर रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे. या केंद्रातून रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते खंबाळपाडा नाल्यात सोडले जाते. ते ठाकुर्लीनजीक रेल्वेमार्गाखालून कल्याण खाडीत जाते. याच नाल्यातील पाणी भाजीपाला शेतीसाठी वापरले जाते, असे त्यांचे म्हणणे आहे.
विषारी भाज्या पिकविणाऱ्या ंविरोधात कदम यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयात धाव घेतली. मंडळाच्या अधिकारी वर्गाला जाब विचारला असता त्यांनी हा प्रश्न आमच्या कार्यकक्षेत येत नाही, असे सांगितले. त्यामुळे कदम यांनी त्यांचा मोर्चा कल्याण कृषी अधिकाऱ्यांकडे वळविला. (प्रतिनिधी)