लहानग्यांसाठी पोकेमॅन, मोठ्यांसाठी हनिमून मटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:04 AM2018-10-31T00:04:24+5:302018-10-31T00:05:01+5:30
गेल्या वर्षीपेक्षा यंदा फटाक्यांवरील जीएसटी कमी झाल्याने फटाक्यांचे दर स्थिर ठेवण्यात आले असल्याचे फटाके विक्रेत्यांनी सांगितले.
- प्रज्ञा म्हात्रे
ठाणे : फटाक्यांसाठी हट्ट करणाऱ्या बच्चेकंपनीसाठी यंदा भरपूर प्रकारांचे फटाके उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठी पाच रंगांची सुरसरी, कोल्ड फायर पाऊस, फुलपाखराप्रमाणे रंग बदलणारी पोकेमॅन फटाकडी तर मोठ्यांसाठी १२ वेळा आवाज करणारा आणि दिवसा-रात्री फोडू शकणारा हनिमून फटाका आला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा फटाक्यांवरील जीएसटी कमी झाल्याने फटाक्यांचे दर स्थिर ठेवण्यात आले असल्याचे फटाके विक्रेत्यांनी सांगितले.
ऐन दिवाळीत बाजारपेठांत झुंबड उडणार असल्याने आठ दिवसांपासूनच फटाके गल्ली लहान मुलांच्या गर्दीने फुलली आहे. आवाजविरहित फटाके लहानांसाठी आले आहे. नवनवीन फटाके खरेदी करण्याकडे लहानांचा कल आहे. लहान मुलांसाठी सुरसुरीमध्ये जम्बो फुलबाजा, साधा फुलबाजा, तडतडी फुलबाजा, चकरीमध्ये म्युझिकल व्हील चक्री आली आहे. कोल्ड फायर पाऊस यंदा नवीन आला आहे.
टिकल्यांऐवजी आता ‘रिंग कॅप’
लहानांसाठी बंदुकीचे विविध प्रकारदेखील आले आहेत. पूर्वी बंदुकीत टिकल्या वापरल्या जात होत्या; परंतु मुलांना सगळे फास्ट हवे असते, हे लक्षात घेऊन आता टिकल्यांऐवजी रिंग कॅप आल्याने बंदुकीत रिंग कॅप वापरली जात आहे.
पिस्तुलसारख्या दिसणाºया रिंग रोलने लहानग्यांना भुरळ घातली आहे. त्यामुळे त्यांची मागणी याच बंदुकीला असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. या सर्वांत दीड फुटांची बंदूकही आकर्षण ठरली आहे.
घराच्या परिसरात लावण्यात येणारे फटाके लहान मुलांसाठी आणले आहेत. लहान मुलांचे फटाके आवाजविरहित असल्याने ते रात्री १० नंतर फोडू शकतात. शासनाने दिलेल्या वेळेच्या नियमांमुळे खरेदी - विक्रीवर कोणताही परिणाम झालेला नाही.
- सतीश पिंगळे