जन्मानंतर काही तासात अपहरण झालेलं बाळ सापडलं, ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2018 02:17 PM2018-01-15T14:17:22+5:302018-01-15T14:38:48+5:30

जन्मानंतर अवघ्या चार तासांत अपहरण झालेल्या बाळाचा शोध घेण्यास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आलं आहे.

Police achieve success in search of kidnapped child from Thane district government hospital | जन्मानंतर काही तासात अपहरण झालेलं बाळ सापडलं, ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील घटना

जन्मानंतर काही तासात अपहरण झालेलं बाळ सापडलं, ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील घटना

Next

- जितेंद्र कालेकर

ठाणे- जन्मानंतर अवघ्या चार तासांत अपहरण झालेल्या बाळाचा शोध घेण्यास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी अपहरण करणाऱ्या महिलेसह दोघांना अटक केली आहे. या महिलेकडून अपहरण करण्यात आलेल्या बाळाला ताब्यात घेण्यात आलं. जिल्हा शासकीय रुग्णालयातून रविवारी पहाटे 3 ते 4 वाजेच्या सुमारास बाळ चोरीला गेल्याची घटना घडली होती. या  घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. मनसेनेही याच पार्श्वभूमीवर रुग्णालयात रविवारी आंदोलन केलं.

या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी या प्रकरणी ठाणे नगर पोलिसांबरोबर समांतर तपासाचे आदेश गुन्हे अन्वेषण विभागाला दिले होते. वरिष्ठ पोलRस निरीक्षक नितिन ठाकरे यांच्या पथकाने बाळासह आधी त्या महिलेला डोंबिवलीच्या पिसवली भागातून अटक केली. त्या पाठोपाठ विजय परमार उर्फ कुबडया यालाही सोमवारी दुपारी ताब्यात घेतले. त्यानी आणखी ही मुले चोरल्याची शक्यता व्यक्त होत आहे. चोरीतील बाळासह या महिलेच्या घरातून आणखी तीन मुले मिळाल्याची माहिती सूत्रानी दिली. आपले बाळ पुन्हा मिळाल्याचे ऐकून त्याच्या आईला प्रचंड आनंद झाला.

नेमकं काय घडलं ?

भिवंडीच्या आदिवासी पाड्यात वास्तव्यास असलेल्या मोहिनी यांना भिवंडीतील इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केलं होतं. त्या वेळी तेथील रुग्णालय प्रशासनाने त्यांना ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले होते. शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तिला ठाण्याच्या रुग्णालयात दाखल केलं. तिने रात्री ११ वाजण्याच्या सुमारास नैसर्गिक प्रसूतीने मुलाला जन्म दिला. रविवारी पहाटे ३.३० ते ४ वाजण्याच्या सुमारास तिच्या आईने बाळाला मागितल्याचा बहाणा करून, एका अनोळखी महिलेने तिच्याकडून हे बाळ नेले. प्रत्यक्षात हे बाळ त्या महिलेने चोरल्याचे अर्ध्या तासाने तिच्या लक्षात आले. तिची आई आणि पती हे चहा पिण्यासाठी पहाटे ३ वाजण्याच्या दरम्यान बाहेर पडले. त्याच वेळी हा प्रकार घडला. काही वेळाने प्रसूती कक्षातील परिचारिका तिच्याकडे बाळाला दूध पाजून झाले का, अशी विचारणा करण्यासाठी गेली. तेव्हा बाळाला आईकडे बाहेर पाठविल्याचे तिने सांगितले. आपण बाळाला आणण्यासाठी कोणत्याही महिलेला पाठविले नसल्याचे तिने सांगितल्यानंतर, तत्काळ पोलिसांना आणि संबंधित डॉक्टरांना याबाबतची माहिती परिचारिकांनी दिली. पोलिसांनी रुग्णालय परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करून, चौकशी सुरू केल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी.सी. केम्पीपाटील यांनी दिली. या घटनेमुळे रुग्णालयीन सुरक्षेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला.

Web Title: Police achieve success in search of kidnapped child from Thane district government hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.