हॉटेल मालकांनी वहानांची सोय न केल्याने भिवंडीत ३१६ तळीरामांवर पोलीस कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 07:24 PM2019-01-01T19:24:25+5:302019-01-01T19:29:11+5:30
भिवंडी : नववर्षाच्या स्वागताच्या निमीत्ताने ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी शहर आणि परिसरांतील हॉटेल व धाब्यांवर पहाटेपर्यंत विविध कार्यक्रम राबविण्यात आले. ...
भिवंडी: नववर्षाच्या स्वागताच्या निमीत्ताने ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी शहर आणि परिसरांतील हॉटेल व धाब्यांवर पहाटेपर्यंत विविध कार्यक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये सहभागी झालेल्या तळीरामांना घरी जाण्याची सोय हॉटेल व धाबा मालकांनी न केल्याने अखेर त्यांना दारूच्या नशेत दुचाकी व चारचाकी चालविताना वहातूक पोलीसांनी पकडून कारवाई केली. भिवंडीतील तीन वहातूक पोलीस कार्यालयाने मिळून ३१६ तळीरामांवर कारवाई केली.
शहर व परिसरांतील हॉटेल व धाब्यांवर गेल्या तीन दिवसांपासून रोषणाई करून ग्राहकांना आकर्षीत केले होते. त्यामुळे वर्षाअखेरीच्या निमीत्ताने तळीरामांनी ठिकठिकाणी गर्दी केली होती. काल रोजी रात्री शहर व ग्रामिण भागात स्थानिक पोलीस व वहातूक पोलीसांनी तळीरामांच्या वहानांच्या गतीमान वहातूकीस प्रतिबंध करण्याच्या निमीत्ताने ठिकठिकाणी नाकेबंदी केली होती. तेथे तीन वहातूक शाखेच्या वतीने ड्रन्क अॅण्ड ड्राईव्ह प्रतिबंधक कारवाई केली. त्यापैकी शहर वहातूक शाखेने ९४,नारपोली वहातूक शाखेने १४७ व रांजनोली वहातूक शाखेने १०५ अशा एकुण ३१६ तळीरामांना मद्यप्राशन करून वहाने चालविताना पकडून कारवाई केली. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी अशा चालकांचे लायसन्स सहा महिने रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.त्यानुसार वहातूक पोलीस किती जणांवर कारवाई करणार आहेत,या कडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. वास्तविक दारू पिण्यास येणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी प्रवासी वहानांची सोय करून देण्याच्या सुचना शासनाने परवाना धारकांना दिले आहेत. परंतू कोणीही दारू अथवा बिअरबार परवाना धारकांनी अशा प्रकारच्या वहानांची सोय केलेली नाही. त्यामुळे अशा परवानाधारक धाबे व हॉटेलमालकांवर उत्पादन शुल्क विभाग व पोलीसांनी कारवाई केलेली नाही. त्यामुळे पोलीसांची दुटप्पी भूमीका असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.