मलंगगड व किल्ले दुर्गाडी हिंदूची वहिवाट, अपप्रचार करणा-याच्या विरोधात पोलिसांची कारवाई शून्य
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 06:39 PM2017-12-28T18:39:52+5:302017-12-28T18:40:05+5:30
कल्याण : मलंगगड आणि किल्ले दुर्गाडीवरील दुर्गाडी देवीचे मंदिर हे हिंदूची वहिवाट असताना त्याविषयी अपप्रचार काही मंडळी व ट्रस्टकडून केला जात आहे. त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी यासाठी शिवसेनेच्या वतीने पोलिसांकडे कारवाईची मागणी करण्यात आली होती. मात्र पोलिसांकडून अद्याप कोणतीही कारवाई केली जात नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने विद्यमान शिवसेना भाजप सरकारला त्याविषयी काही निर्णय घेता येत नाही. मात्र मलंग गडावर केवळ उत्सवाच्या काळात आरती न घेता दर महिन्याला आरती घेतली जाईल असे शिवसेनेचे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी सांगितले.
हाजी मलंग बाबा ट्रस्टच्या लेटर हेडवर एक प्रसिद्ध पत्रक काढण्यात आले होते. त्याठिकाणी हिंदू संघटना येतात. आरती करतात. त्यामुळे हिंदू मुस्लीम धर्मात तेढ निर्माण केली जात आहे. हिंदूनी गडावर आरती करु नये. केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. ही प्रेसनोट काढणा-या ट्रस्टहा नोंदणीकृत नसल्याचे गोपाळ लांडगे यांनी सांगितले. त्यांच्या या माहितीला मलंग गडावरील आंदोलनात आनंद दिघे यांच्या काळापासून सक्रीय असलेले दीनेश देशमुख यांनी दुजोरा दिला. या संदर्भात माहिती देण्यासाठी कल्याणच्या टिळकचौकातील शिवसेना शाखेत आयोजित पत्रकार परिषदेत लांडगे यांनी उपरोक्त माहिती दिली. या प्रसंगी शहर प्रमुख विश्वनाथ भोईर, महिला आघाडीच्या विजया पोटे, परिवहनचे माजी सभापती रविंद्र कपोते आणि दीपक सोनाळकर आदी उपस्थित होते. मलंग गड हा श्री पीर हाजी मलंग साहेब दर्गा न्यास या नावाने धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत आहे. या न्यायाला ई-60 हे प्रमाणपत्र बहाल करण्यात आले आहे. त्यानुसार हे देवस्थान सर्व धर्मियांसाठी खुले आहे. तरी देखील एका ट्रस्टने त्याची नोंदणी नसताना प्रसिद्ध पत्र काढून हिंदूच्या वहिवाट असलेल्या मलंग गडावर हिंदूना आरती पूजन करण्यासाठी मज्जाव केला आहे. त्यांच्या विरोधात हिल लाईन पोलिस ठाण्यात शिवसेनेच्या वतीने तक्रार दिली गेली आहे. त्याचबरोबर उल्हासनगरचे पोलिस उपायुक्तांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी काही एक कारवाई केली नाही. केवळ आश्वासन दिलेले आहे. मलंग गडावर 2 जानेवारी पौष पौर्णिमा, 14 तारखेला संक्रातीला आणि 31 जानेवारीला पालखी सोहळा हे उत्सव साजरे केले जाणार आहेत. केवळ उत्सवाच्या दरम्यान गडावर न जाता दर महिन्याच्या पौर्णिमेला आरती केली जाईल अशी माहिती लांडगे यांनी दिली आहे. ट्रस्टीन सुरु केलेला अपप्रचार असून तो बंद करावा अन्यथा त्यांचा बंदोबस्त शिवसेना करेल असा इशारा लांडगे यांनी दिला आहे.
नोंदणीकृत ट्रस्ट पाचच
श्री पीर हाजी मलंगसाहेब दर्गा, दी दर्गा ऑफ मीर सुलतान साहेब, बक्तारबाबा दर्गा हाजीमलंगवाडी, कबरस्तान अॅण्ड मशीद कमीटी हाजी मलंग गड, कमलीशाह बाबा दर्गा व छबील ट्रस्ट या संस्था नोंदणीकृत आहेत. वरील पैकी कोणतीही संस्था वक्फ बोर्डाकडे वर्ग झालेली नाही. ही माहिती माहिती अधिकारात दिनेश देशमुख यांनी काढली आहे.
केवळ मलंग गडावर हिंदूना मज्जाव केला जात नाही. तर कल्याणच्या किल्ले दुर्गाडीला सर्वोच्च न्यायालयाने मंदिराचा दर्जा देऊन हे हिंदूचे देवस्थान आहे असा निकाल दिला आहे. मंदिराच्या मागच्या भिंतीच्या मागे मुस्लिम वर्षातून दोन वेळा नमाज पठण करतात. आत्ता त्याठिकाणीही हिंदूना फिरकू दिले जात नाही. मंदिराच्या आरतीला मज्जाव केला जात आहे. मुस्लीमांच्या कडून घातली जाणारी बंदी हीच मुळात बेकायदेशीर आहे. आघाडी सरकारने मंदीराची जागा ही वक्फ बेार्डाकडे दिली असा आरोप शिवसेनेने केला आहे. मुस्लीमांची वहिवाट नसताना त्याठिकाणी मंदिराची जागा वक्फ बोर्डाची होऊ शकत नाही. तरी देखील वक्फ बोर्डाने कल्याण न्यायालयात ही जागा वक्फ बोर्डाकडे वर्ग करावी असा दावा दाखल केला आहे. हा दावा 1976 पासून कल्याण न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. त्याची सुनावणी येत्या 2 जानेवारी रोजी होणार आहे. ही जागा हिंदूची वहिवाट असल्याने वक्फ बोर्डाकडे वर्ग करुन नये अशी मागणी शिवसेनेच्या वतीने न्यायालयात करण्यात आली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.
हिंदू आरती करुन धर्मात तेढ निर्माण करीत नसून त्यांना आरतीचा अधिकार नाकारणारे लोकच समाजात तेढ निर्माण करीत त्यांचा बंदोबस्त पोलिसांनी करावी अशी शिवसेनेची मागणी आहे. दुर्गाडी किल्ल्याची नासधूस झाली आहे. त्याचा देखभाल दुरुस्तीचे काम सुरु आहे. कंत्रटदाराच्या ढिसाळपणामुळे त्यात दिरंगाई होत असल्याचा खुलासा लांडगे यांनी केला. त्या कामावर शिवसेनेचे बारीक लक्ष्य आहे.