भाजपा आमदाराच्या शाळेची बससेवा घेण्यासाठी अन्य वाहनांवर पोलिसांची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 09:40 PM2018-01-24T21:40:24+5:302018-01-24T21:40:56+5:30
मिरा रोडच्या सेव्हन सक्वेअर अकॅडमी शाळेच्या बस व्यतिरिक्त विद्यार्थी घेऊन येणा-या अन्य वाहनांवर वाहतुक पोलिसांमार्फत कारवाई करायला लावली.
मिरा रोड - मिरा रोडच्या सेव्हन सक्वेअर अकॅडमी शाळेच्या बस व्यतिरिक्त विद्यार्थी घेऊन येणा-या अन्य वाहनांवर वाहतुक पोलिसांमार्फत कारवाई करायला लावली. शिवाय व्हॅनची चावी काढुन घेतल्याचा आरोप करत संतप्त पालकांनी भाजपा आमदार नरेंद्र मेहतांच्या सेव्हन इलेव्हन कंपनीच्या कार्यालयास घेराव घातला होता. तर विद्यार्थ्यांची वाहतुक करणारी ही वाहनं शासन निकषा प्रमाणे नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पोलीसां कडे तक्रार केल्याचे भाजपा आमदार नरेंद्र मेहतांनी स्पष्ट केले.
भाजपा आमदार नरेंद्र मेहता तथा कुटुंबियांशी सबंधित सेव्हन इलेव्हन कंपनी तसेच सेव्हन स्क्वेअर अकॅडमी ही शाळा आहे. सदर शाळेच्या स्कुल बस असल्या तरी त्या बस सेवेचे शुल्क न परवडणारया पालकांनी अन्य व्हॅन आदीचा पर्याय निवडला आहे.
परंतु शाळेच्या बस व्यतीरीक्त विद्यार्थी वाहणारया व्हॅन विरोधात आ. मेहतांनी वाहतुक पोलीस निरीक्षक जगदिश शिंदे यांच्या कडे तक्रार केली होती. आमदारांची तक्रार आल्याने वाहतुक पोलीसांनी देखील गेल्या आठवड्यात ५ वाहनां विरोधात कारवाई देखील केली.
दरम्यान सोमवारी आ. मेहतांनी एका विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यास आलेल्या बाहेरच्या व्हॅनची चावी काढुन घेतली. त्या वरुन पालक संतप्त झाले. मोठ्या संख्येने पालक शाळे बाहेर जमले. त्यांनी शाळे जवळील सेव्हन इलेव्हन च्या कार्यालयास घेराव घातला होता. नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राम भालसिंग देखील पोलीस पथकासह घटनास्थळी आले.
या वेळी एका विद्यार्थ्याने सांगीतले की, मेहता यांनी येऊन व्हॅनची चावी काढत विद्यार्थ्यांना गुराढोरां सारखे कोंबले जाते म्हणत व्हॅनचालक महिलेशी अरेरावी केली. व्हॅनची क्षमता १४ विद्यार्थ्यांची होती अािण आम्ही १० च विद्यार्थी त्यात होते असे तो म्हणाला.
मेहतांच्या शाळेची बस सेवा घ्या असे सांगीतले जाते. पण आम्ही घेत नाही. कारण ते जास्त पैसे घेतात तेही आधी द्यावे लागतात. शिवाय विद्यार्थ्याची जबाबदारी आमची नाही लिहुन घेतात. आम्हाला परवडते व सोयीचे वाटते त्या वाहनातुन आम्ही मुलांना पाठवतो. पण यांच्या दबावाखाली पोलीस प्रशासन पण आम्हाला धमकावत आहेत असा आरोप उपस्थित पालकांनी केला.
दरम्यान आ. मेहता यांनी मात्र आपण शाळेची बस सेवा घेण्यासाठी कोणाही पालकांना सांगत नाही. विद्यार्थ्यांची वाहतुक करणारया शाळेच्या बस - वाहनां साठी शासनाचे निकष आहेत. त्याचे पालन केले जात नाही. विद्यार्थ्यांना जास्त संख्येने या वाहनां मधुन कोंबले जाते म्हणुन आपल्या निदर्शनास आले असता पोलीसां कडे तक्रार केल्याचे सांगीतले. चावी काढणे, महिलेस अरेरावीने बोलणे आदी प्रकारच घडला नसल्याचे ते म्हणाले.