पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये भर रस्त्यात बाचाबाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:28 AM2021-06-25T04:28:24+5:302021-06-25T04:28:24+5:30
ठाणे : घनकचऱ्याचा डंपर रस्त्याच्या बाजूला का उभा केला, याचा जाब विचारून डंपरचालकाला पोलिसांनी मारहाण करण्याचा प्रकार गुरुवारी ...
ठाणे : घनकचऱ्याचा डंपर रस्त्याच्या बाजूला का उभा केला, याचा जाब विचारून डंपरचालकाला पोलिसांनी मारहाण करण्याचा प्रकार गुरुवारी ठाण्यातील कोर्टनाका परिसरात घडला. हा डंपरचालक पालिकेचा कर्मचारी असल्याने त्याचवेळेस त्याच परिसरात पाहणी दौऱ्यावर असलेल्या पालिका अधिकाऱ्यांनी पोलिसांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्हाला कायदा शिकवू नका, असे सांगत पोलिसांनी पालिकेच्या दोन उपायुक्तांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस आणि पालिका अधिकारी यांच्यात तब्बल अर्धा तास शाब्दिक बाचाबाची सुरू राहिल्याने ठाणेकरांची चांगलीच करमणूक झाली. प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत गेले. महापालिका आयुक्तांनी मध्यस्थी केल्यानंतर अरेरावी करणाऱ्या पोलिसांवर पालिका अधिकाऱ्यांची माफी मागण्याची वेळ आली.
गुरुवारी सकाळी घनकचऱ्याचा डंपर रेस्ट हाउसजवळील रस्त्याच्या कडेला उभा होता. त्याच वेळेस बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी इथे डंपर उभा करू नको, असे डंपरचालकाला सांगितले. मी फोन करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारतो, असे डंपरचालकाने सांगताच पोलिसांचा पारा चढला. पोलिसांनी चालकाला शिवीगाळ करीत खाली उतरवून मारहाण केली, अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. योगायोगाने पाहणी दौऱ्यावर असलेल्या पालिका अधिकाऱ्यांनी हे दृश्य पाहून मध्यस्थीचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी पालिका अधिकाऱ्यांनाच दुरुत्तरे केली. त्याच वेळेस या भागातून पालिका आयुक्तांचा पाहणी दौरा सुरू होणार होता. त्यामुळे अधिकाऱ्यांची फळी त्या ठिकाणी दाखल झाली होती. दोन उपायुक्तांनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. परंतु तुम्ही आम्हाला कायदा शिकवू नका, असे त्यांना पोलिसांनी सुनावले. त्यामुळे वाद आणखीनच चिघळला. पालिका व पोलीस यांच्यातील बाचाबाची पाहण्याकरिता ठाणेकरांनी गर्दी केली होती. अर्धा तास त्यांचे फुकट मनोरंजन झाले. दोन पोलीस निरीक्षक ऐकण्यास तयार नव्हते. डंपरचालकाच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करूच, असे त्यांनी सांगितले. प्रकरण ठाणे नगर पोलीस स्टेशनपर्यंत गेले. परंतु महापालिकेतील उच्चपदस्थांनी आयुक्तांच्या कानावर हा प्रकार घातल्यावर त्यांनी मध्यस्थी केल्याने अखेर पोलिसांना पालिका अधिकाऱ्यांची माफी मागावी लागली.
............
वाचली