भिवंडीत राम मंदिर सोहळा शांततेत साजरा करण्याचे पोलिसांचे आवाहन
By नितीन पंडित | Published: January 18, 2024 06:26 PM2024-01-18T18:26:36+5:302024-01-18T18:26:57+5:30
या प्रसंगी मार्गदर्शन करताना पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी सर्वांनी उत्सव साजरा करताना इतर समाज बांधवांची काळजी घेऊन साजरा करावयाचा आहे.
भिवंडी : २२ जानेवारी रोजी राम मंदिर लोकार्पण सोहळा साजरा होत असताना संपूर्ण देशभर उत्सव साजरा केला जात आहे.भिवंडी शहरात सुद्धा असंख्य हिंदुत्ववादी संघटना,विविध सामाजिक संस्थांकडून राम मंदिर लोकार्पण सोहळा धुमधडाक्यात साजरा होत असताना भिवंडी पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी शहर शांतता समिती सदस्य यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीस सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर खैरनार,दीपक देशमुख, पालिका अतिरिक्त संजय हिरवाडे यासोबतच पोलिस अधिकारी,टोरंट पॉवर कंपनीचे प्रतिनिधी,विविध समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते.
या प्रसंगी मार्गदर्शन करताना पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी सर्वांनी उत्सव साजरा करताना इतर समाज बांधवांची काळजी घेऊन साजरा करावयाचा आहे. त्यामुळे कोणत्याही जाती धर्माच्या समुदायाच्या भावना दुखावणार नाहीत याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.तर शहरात लावलेले बॅनर झेंडे यांची जबाबदारी स्वतः लावणाऱ्यांनी घ्यावयाची आहे असे सांगत,जेथे कोठे कोणी कार्यक्रम आयोजित करणार आहे मिरवणूक जल्लोष साजरा करणारा आहेत त्याची माहिती संबंधित पोलिस ठाण्यात देणे गरजेचे आहे.उत्सव आनंदात साजरा करताना कोणतेही गालबोट लागणार नाही,कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होणार नाही याची खबरदारी घेऊन कायदा मोडणाऱ्यां विरोधत कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिला.