ताणतणावातून पोलीस संपवताहेत जीवनयात्रा! पाच वर्षांत नऊ जणांच्या आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 06:32 AM2017-09-11T06:32:42+5:302017-09-11T06:32:58+5:30
कौटुंबिक कलह, आजारपण असो वा प्रेमप्रकरण अशा वेगवेगळ्या कारणांतून नागरिकांच्या रक्षणासाठी उभा असणारा पोलीसही आत्महत्येचा प्रयत्न करीत आहे. मागील पाच वर्षांत ठाणे शहर, मुंबई तसेच रेल्वे पोलीस दलातील तीन महिला कर्मचाºयांसह नऊ जणांनी ठाण्यात आत्महत्या केली आहे.
- पंकज रोडेकर
ठाणे : कौटुंबिक कलह, आजारपण असो वा प्रेमप्रकरण अशा वेगवेगळ्या कारणांतून नागरिकांच्या रक्षणासाठी उभा असणारा पोलीसही आत्महत्येचा प्रयत्न करीत आहे. मागील पाच वर्षांत ठाणे शहर, मुंबई तसेच रेल्वे पोलीस दलातील तीन महिला कर्मचाºयांसह नऊ जणांनी ठाण्यात आत्महत्या केली आहे.
गतवर्षी बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीची धामधूम संपत नाही, तोच ठाणे शहर पोलीस दलातील एका पोलीस कॉन्स्टेबलने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्या घटनेला एक वर्ष होत नाही, तोच बुधवार ६ सप्टेंबर रोजी महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार यांनी आत्महत्या केली. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील परिमंडळ-१ आणि ५ या दोन परिमंडळांत ठाणे, मुंबई आणि ठाणे लोहमार्ग पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाºयांसह ८ पोलिसांनी टोकाची भूमिका घेऊन आत्महत्या केली आहे.
कुटुंबांसह हॉटेलमध्ये जेवणासाठी गेलेले मुंबई पोलीस दलातील दहशतवादविरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त संजय बॅनर्जी यांनी त्यांच्या खाजगी रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. रस्ते अपघातात पाय गमावणारे ठाणे शहर पोलीस दलातील पोलीस हवालदार भरत थोरात (५१) यांनी वर्तकनगर येथे स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली. शहर मुख्यालयातील पोलीस टिपू सुलतान बालेखान मुल्लाने स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली. नौपाड्याचे पोलीस अच्युत शिंदे यांनी आजाराला कंटाळून गावी आत्महत्या केली. तत्पूर्वी, कळव्यातही अर्चना हिवरे या महिला कर्मचाºयाने रॉकेल ओतून पेटवून घेतले. ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यातील वैशाली पिंगट यांनीही पोलीस ठाण्यातच ९ एमएम पिस्टलने स्वत:वर गोळी झाडून घेतली होती.
शहर पोलीस आयुक्तालयाच्या नव्या मुख्यालयात रात्रपाळीला असलेल्या कॉन्स्टेबल दिलीप सिंगनवार (२८) याने एसएलआरमधून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. गतवर्षी गणेशोत्सवात शहर पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल सागर माळूजकर यानेही गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मृत्यूशी झुंज देताना, त्याची प्राणज्योत मालवली होती.
वेळीच मार्ग काढणे गरजेचे
प्रत्येकाला ताणतणाव असतो. त्याचा अतिरेक झाल्याने एखादा टोकाची भूमिका घेण्याची शक्यता असते. त्यामुळे अगदी लहानातले लहान तणावाचे विषय मनात न ठेवता दुसºयांशी मनमोकळेपणाने चर्चा करून ते दूर करावेत आणि या तणावातून वेळीच मार्ग काढणे गरजेचे असल्याचे मत मानसोपचारतज्ज्ञांनी व्यक्त केले.