बाजारपेठ पोलीस ‘न्यायाच्या’ प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 05:47 AM2018-10-05T05:47:18+5:302018-10-05T05:47:32+5:30
प्रस्ताव प्रलंबित : पत्र्यांच्या शेडवजा इमारतीतून हाकला जातो कारभार
सचिन सागरे
कल्याण : पश्चिमेतील बाजारपेठ पोलीस ठाण्याची अवस्था अतिशय दयनीय आहे. या पोलीस ठाण्यासाठी पत्र्यांची शेडवजा इमारत असून अतिशय कोंदट वातावरणात पोलिसांना कर्तव्य करावे लागत आहे. नवीन इमारतीसाठी जवळपास आठ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. २४ आॅक्टोबर १९७० रोजी पश्चिमेतील दूधनाका येथे बाजारपेठ पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात आली. या जागेचे क्षेत्रफळ ३०३७ चौ. फूट असून पोलीस ठाणे ९०५ चौरस फूट क्षेत्रफळात आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोकसंख्या २.५० लाख आहे. येथे एक वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह १४७ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा ताफा असून दुर्गाडी पूल, दुर्गाडी किल्ला, एमएसईबी कार्यालय, केडीएमसी, एमएमआरडीए आणि आधारवाडी कारागृह या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आहे.
पोलीस ठाण्याची वास्तू सुरक्षित नसून अधिकारी, कर्मचाºयांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. पोलीस आयुक्तालयातील कल्याण परिमंडळ-३ अंतर्गत आठ पोलीस ठाणी आहेत. त्यातील चार डोंबिवलीत असून चार कल्याण शहरात आहेत. कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्याची इमारत सुसज्ज आहे. कोळसेवाडी आणि महात्मा फुले चौक पोलीस ठाणेही नवीन वास्तूत स्थलांतरित झाले. बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीसाठी
२०१० पासून कल्याण पश्चिमचे तत्कालीन आमदार प्रकाश भोईर यांनी शासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, हा विषय अद्याप प्रलंबित आहे.