ठाण्यातून सराईत चोरट्यांना अटक: दोन लाखांचे दागिने हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 10:13 PM2020-01-14T22:13:37+5:302020-01-14T22:21:57+5:30
माजीवडा येथील एका घरातूनच चार महिन्यांपूर्वी चोरी करुन पसार झालेल्या दिनेश अहिरे आणि नंदू दोडके या दोन सराईत चोरटयांना कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीतील एक लाख ७५ हजारांचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: चार महिन्यांपूर्वी माजीवडा भागातील एका घरामध्ये चोरी करुन पसार झालेल्या दिनेश अहिरे (१९) आणि नंदू दोडके (२०, रा. माजीवडा, ठाणे) या दोन सराईत चोरट्यांना कापूरबावडी पोलिसांनी नुकतीच अटक केली. त्यांच्याकडून एक लाख ७५ हजारांचे दागिनेही हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
माजीवडा येथील रहिवासी लक्ष्मी धोत्रे यांच्या घरी कोणी नसताना त्यांच्या घराचा पत्रा उचकटून १५ आॅगस्ट २०१९ रोजी सकाळी ७ ते दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी तिजोरीतील चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने आणि २० तोळे वजनाचे चांदीचे असे एक लाख ७५ हजारांच्या दानिन्यांची चोरी केली होती. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अशोक वाघ, पोलीस नाईक योगेश वाणी, पोलीस कॉन्स्टेबल निखील जाधव, रोहिदास राठोड, शंकर राठोड आणि राजेंद्र पारधी आदींच्या पथकाने दिनेश आणि आकाश या दोघांना ८ जानेवारी रोजी ताब्यात घेतले. त्यांनी या चोरीची कबुली देऊन चोरीतील सर्व चार तोळे सोन्याचे आणि २० तोळे चांदीचे दागिनेही परत दिले. त्यांना सहा दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. त्यांच्याकडून आणखीही चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.