रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपलेले बाळ चोरणाऱ्या आरोपीला अटक; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2022 10:20 PM2022-05-06T22:20:12+5:302022-05-06T22:23:21+5:30
अवघ्या ८ तासांत पोलिसांनी बाळ चोरणाऱ्याला केली अटक
पालघर: रेल्वे ट्रॅकमध्ये काम करणाऱ्या एका महिलेचे बोईसर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर २-३ वर झोपलेले बाळ पळवून नेणाऱ्या ३५ वर्षीय आरोपीस पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी नरेश रणधीर आणि त्याच्या टीमने अवघ्या आठ तासात अटक करण्यात यश मिळविले.
मध्यप्रदेशच्या जमानिया गावातील वर्षा कन्हैया डामोर(वय २४वर्ष) ह्यानी आपले पती आणि कुटुंबियांसोबत रेल्वे ट्रॅक मधील कामाचा ठेका घेतला होता.शुक्रवारी सकाळी ११ वाजल्याच्या दरम्यान सदर महिलेने आपली आठ वर्षीय मुलीला रेल्वे पुलाला झोळीत बांधून त्यात झोपवून जवळच रेल्वे ट्रॅक मध्ये कामाला निघून गेली. काम करता करता अर्धा किलोमीटरपर्यंत दूर गेल्यावर तिच्या सोबत काम करणाऱ्या महिलेने झोळीत मुलगी नसल्याचे सांगितले.तात्काळ सदर महिलेने घटनास्थळी धाव घेतली.आपले लहान बाळ चोरीला गेल्याने त्यांनी तात्काळ रेल्वे लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधला.पालघर लोहमार्ग ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी नरेश रणधीर ह्यांनी बोईसर स्थानकाच्या चोहोबाजूला आपल्या टीम रवाना केल्या. वैतरणा ते डहाणू स्थानका दरम्यान सीसीटीव्ही ची व्यवस्था नसल्याने बाळाचा शोध घेण्याचे मोठे आव्हान पोलिसा समोर उभे ठाकले होते.ह्यावेळी पोलीस कर्मचारी समाधान दोंदे ह्यांनी बंदोबस्ताला येणाऱ्या आपल्या सर्व होमगार्ड टीम च्या व्हाट्सअप ग्रुपवर मुलगी चोरीला गेल्याचा मेसेज पाठवून मुलीचे वर्णन पाठवले.ही क्लुप्ती यशस्वी ठरत सदर आरोपी त्या आठ महिन्याच्या मुलीला घेऊन कुंभवली येथे रस्त्याने जात असल्याचे योगेश तरे ह्या होमगार्डला आढळले.त्यांनी त्या आरोपी आणि मुलीचा फोटो काढून अधिकारी रणधीर याना पाठवल्या नंतर मुलीच्या आईने आपल्या मुलीला ओळखले.पोलिसांनी तात्काळ आरोपीला पालघर पोलीस ठाण्यात हजर केले.आपल्या आईला पाहून ते लहान बाळ आईच्या दिशेने झेपावत तिच्या कुशीत विसावले.अवघ्या आठ तासाच्या कालावधीत हातात कुठलाही क्लु नसताना वरिष्ठ अधिकारी नरेश रणधीर आणि त्यांच्या टीमने आई पासुन विलग झालेल्या बाळाला पुन्हा तिच्या कुशीत देण्याचे समाधान मिळाल्याच्या भावना लोकमत शी बोलताना व्यक्त केल्या.