ठाण्यात स्पा-मसाजपार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 09:49 PM2019-12-19T21:49:25+5:302019-12-19T21:53:56+5:30
एका नामांकित हॉटेलमधील इमारतीमध्ये स्पा आणि मसाजपार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणा.या प्रसाद शंकरन (४८, रा. मरोळ, मुंबई) या स्पाचालकाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने बुधवारी अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : वागळे इस्टेट येथील एका नामांकित हॉटेलमधील इमारतीमध्ये स्पा आणि मसाजपार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविणा-या प्रसाद शंकरन (४८, रा. मरोळ, मुंबई) या स्पाचालकाला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने बुधवारी अटक केली. त्याच्या तावडीतून पाच पीडित तरुणींची सुटका केली आहे.
वागळे इस्टेट येथील ‘हॉटेल शरणम्’च्या पाचव्या माळ्यावर ‘केरळ आयुर्वेदिक ट्रीटमेंट सेंटर’ नावाचे स्पा चालविले जाते. या स्पामध्ये मसाजपार्लरच्या नावाखाली काही तरुणींकडून शरीरविक्रयाचा व्यवसाय करून घेण्यात येत असल्याची माहिती ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांना मिळाली होती. त्या आधारे कडलग यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक शीतल मदने यांच्या पथकाने १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास या स्पावर छापा टाकला. यावेळी काही तरुणींना पैशांचे आमिष दाखवून ग्राहकांशी शरीरसंबंध ठेवण्यास प्रवृत्त केले जात असल्याचे आढळले. ग्राहकांकडून पाच ते दहा हजार रुपये घेऊन या तरुणींना त्यातील काही वाटा देण्याचे आमिष दाखविले जायचे. हे सेक्स रॅकेट चालविणा-या शंकरन याला या पथकाने अटक केली असून त्याच्या तावडीतून पाच तरुणींची सुटका केली आहे. त्यांच्याकडून रोकड आणि काही सामग्री हस्तगत केली आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.