ठाण्यात लोकलवर दगडफेक करणा-याला पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2018 05:39 PM2018-09-03T17:39:16+5:302018-09-03T17:39:40+5:30
जलद लोकलवर दगड फेकणाऱ्या सुरेश पवार (35) याला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. सुरेशनं दगड अपंग डब्यात झोपले असताना उठवणाऱ्या व्यक्तीवर फेकला होता.
ठाणे: जलद लोकलवर दगड फेकणाऱ्या सुरेश पवार (35) याला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अटक केली. सुरेशनं दगड अपंग डब्यात झोपले असताना उठवणाऱ्या व्यक्तीवर फेकला होता. पण त्याचवेळी लोकल सुरू झाल्याने अपंगांचा डबा पुढे गेला आणि महिला डब्यात खिडकीजवळ बसलेल्या नेरळ येथील शकुंतला बागुल यांच्या डोक्याला तो दगड लागल्याने त्या जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. हा प्रकार रविवारी दुपारी घडला होता.
घरदार नसलेल्या सुरेश हा कसाराहून सीएसटीकडे जाणाऱ्या जलद लोकलमधील अपंग डब्यात झोपून प्रवास करत होता. दिव्यात लोकल आल्यावर डब्यात चढलेल्या एकाने त्याची झोपमोड केली आणि त्याचे मळके कपडे पाहून त्या डब्यातून हाकलून लावले. याचा राग मनात धरून त्याने त्याला उठवणाऱ्यावर व्यक्तीवर एक दगड फेकला. पण तो दगड कोणाला लागला नाही, त्यावेळी त्याने दुसरा दगड उचलून फेकला आणि तोपर्यंत लोकल सुरू झाल्याने तो दगड शकुंतला यांना लागला. त्यांना जखमी अवस्थेत ठाणे रेल्वे स्थानकात उतरवून तेथील प्रथमोपचार केंद्रात मलमपट्टी करून घरी सोडण्यात आले. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत न्यायालयात हजर केल्याची माहिती पोलीस निरीक्षक स्मिता धाकणे यांनी दिली.