ठाण्याच्या बाजारपेठेतील कापड दुकानातून चोरी करणा-या चोरटयास पोलिसांनी रंगेहाथ पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 06:08 PM2017-12-11T18:08:22+5:302017-12-11T18:14:16+5:30
एकीकडे भल्या पहाटे आणि सायंकाळच्या सुमारास ठाणे पोलिसांनी पायी पेट्रोलिंग सुरु केली आहे. तरीही चोरीचे धाडस करणा-या एका चोरटयास नौपाडा पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे.
ठाणे: येथील रेल्वे स्थानकाजवळील भाजी मार्केटसमोरील एका कापडाच्या दुकानातून चोरी करणा-या सुनिल लक्ष्मण कोळी उर्फ जॉन्टी याला नौपाडा पोलिसांनी शनिवारी पहाटेच्या सुमारास नागरिकांच्या मदतीने रंगेहाथ पकडले आहे. त्याच्याकडून चोरीतील सर्वच्या सर्व ४० हजारांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
राम मारुती रोडवर असलेल्या महेंद्र गेहलोक (३३) यांच्या कापड दुकानातून त्याने पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ड्रेसचे सुमारे ३२ नग चोरुन पलायनाचा प्रयत्न केला. त्याचवेळी तिथे जवळच झोपलेल्या एका दक्ष नागरिकाला त्या दुकानातून तो बाहेर पडतांनाचा आवाज आला. हा आवाज ऐकून त्याने पोलीस नियंत्रण कक्षाकडे याबाबतची माहिती दिली. तोपर्यंत आणखी काही नागरिकांनी त्याला पकडले. तितक्यात नौपाडा पोलीस ठाण्यातून आलेल्या दोन बिट मार्शलनीही त्याला पकडले. त्याने या दुकानातून चोरलेला रेडीमेड कपडयांचा ऐवजही त्याच्याकडून हस्तगत करण्यात आला. गेहलोक यांनी ८ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास दुकान बंद केले होते. त्यानंतर ९ डिसेंबरच्या पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. कोणाला संशय येउ नये म्हणून त्याने भंगार गोळा करण्याच्या गोणीमध्ये या दुकानातील माल ठेवला होता. भरलेली गोणी तो तसाच घेऊन जात असतांना नौपाडा पोलिसांच्या बिट मार्शलनी त्याला रंगेहाथ पकडले. नौपाडा पोलीस याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितले.
--------------
चोरी तसेच सोनसाखळी जबरी चोरीच्या प्रकारांना आवर बसावा यासाठी ठाण्यात चोरीचे प्रकार मात्र कमी झालेले नाहीत. गेल्या काही दिवसांपासून हवेत गारवा निर्माण झाल्यानंतर पडलेल्या थंडीमुळे रहिवाशी साखर झोपेत असतांना घरात बिनधास्तपणे शिरुन चोरीचे प्रकारही वाढील लागले आहेत. त्यामुळे पोलिसांनीही गस्तीचे प्रमाण वाढवावे, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.
.......................................