मनसेच्या सात जणांना जामीन मिळाल्यानंतर पुन्हा अटक, नौपाडा पोलिसांनी केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2017 08:24 PM2017-10-25T20:24:10+5:302017-10-25T20:26:29+5:30
रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना पिटाळून लावताना धुडगूस घालत त्यांना मारहाण करणा-या मनसेचे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह सात जणांना ठाणेनगरच्या गुन्ह्यात बुधवारी जामीनावर सुटका झाली.
ठाणे - रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना पिटाळून लावताना धुडगूस घालत त्यांना मारहाण करणा-या मनसेचे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह सात जणांना ठाणेनगरच्या गुन्ह्यात बुधवारी जामीनावर सुटका झाली. ही सुटका होताच नौपाडा पोलिसांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील गुन्ह्यात या सातही जणांना अटक केली असून, त्यांना न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी दिली.
आधीच जाहीर केल्याप्रमाणे शनिवारी जाधव यांच्यासह त्यांच्या आठ ते दहा कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना पिटाळून लावताना त्यांच्या सामानाची तोडफोड केली होती. काही रिक्षाचालकांशीही हुज्जत घालत त्यांना हुसकावून लावले होते. याप्रकरणी ठाणेनगर पोलिसांनी सुरुवातीला जाधव यांच्यासह महेश कदम, रवींद्र मोरे, रवींद्र सोनार आणि संदीप साळुंखे या पाच जणांना सोमवारी नाट्यमयरीत्या अटक केली. त्यानंतर मंगळवारी याच प्रकरणात आणखी दोघांना अटक करण्यात आली. दरम्यान, या सातही आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपल्यानंतर त्यांना ठाणेनगर पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांची जामीनावर सुटका केली.
मात्र, सॅटीस पुलाच्या खाली ट्रॅफिक चौकीच्या बाजूला असलेल्या फेरीवाल्यांचे सामान फेकून, नुकसान करणे तसेच त्यांना दमदाटी आणि मारहाण करणे, रिक्षाचालकांना दमदाटी केल्याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यातही दाखल असलेल्या अन्य एका गुन्ह्यात त्यांचा ताबा नौपाडा पोलिसांनी घेतला. याप्रकरणी न्यायालयाने या सातही जणांना आणखी एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे जामीनावर सुटका होऊनही या सातही जणांचा पोलीस कोठडीतील मुक्काम आता आणखी एक दिवसाने वाढला आहे.