ठाण्यात पोलिसांचे बीट मार्शल घालणार सायकलीवरुन गस्त
By जितेंद्र कालेकर | Published: January 7, 2024 08:28 PM2024-01-07T20:28:26+5:302024-01-07T20:28:35+5:30
सायकल रॅलीत नागरिकांसह उपायुक्तांचाही सहभाग: मंगळसूत्र चोऱ्यांवर ठेवणार अंकुश.
ठाणे: पायी किंवा थेट मोबाईलवरुन गस्तीबरोबरच यापुढे सायकलवरुनही पोलिसांची गस्त घातली जाणार असून यातून मंगळसूत्र आणि मोबाईल जबरी चोरीसारख्या गुन्हयांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी दिली. महाराष्ट्र पोलिस वर्धापन दिनानिमित्त (रेझिंग डे) रविवारी सायकल रॅलीचे आयोजन केले होते. यामध्ये पोलिस उपायुक्त गणेश गावडे यांच्यासह ७० वर्षांचे जेष्ठ नागरिकही सहभागी झाले होते.
रेझिंग डे निमित्त ठाणे शहर पोलिसांच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून नौपाडा पोलिस ठाणे आणि ‘आम्ही सायकल प्रेमी’ फाऊंडेशनच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीमध्ये ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली येथील १०७ हून अधिक सायकलप्रेमींनी सहभाग घेतला होता. उपायुक्त गावडे यांच्यासह नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्षीरसागर तसेच अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनीही सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला.
रविवारी सकाळी ७.३० वा. चिंतामणी चौक येथून सुरु झालेली ही रॅली दगडी शाळा येथून उपवनमार्गे जाऊन पुन्हा चिंतामणी चौक येथे समाप्त झाली. उपायुक्त गावडे यांनी रेझींग डे निमित्त सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती देत सर्व सायकलप्रेमींचे कौतुक केले. कोणत्याही अडचणीत किंवा एखादा अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांच्या ११२ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले. सायकल चाेरीच्या घटनांचीही दखल गंभीरतेने दखल घेतली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर युवा एनजीओ फाऊंडेशनचे स्वप्नील मराठे, सिमरन ग्रुपचे दीपक बेंडोकळी, मनिस कॅफेचे मुत्थु नायर, वरिष्ठ सायकलप्रेमी प्रा. नारायण बारसे, प्रा. सुनील भुसारा आदी उपस्थित होते. या सायकल राईडचे नेतृत्व भुसारा यांच्यासह गजानन दांगट, संकेत सोमणे, पंकज रिझवानी, लतिक गोलटकर, धनंजय तेलगोटे, अभिजीत राजे, मीनाक्षी आणि काशिनाथ गायकवाड यांनी केले.
बीट मार्शल सायकलचे उद्घाटन-
आतापर्यंत पोलीस हे मोटारसायकलीवरुन गस्त घालत होते. आता ही गस्त सायकलवरुन घातली जाणार आहे. रेझिंग डेच्या निमित्ताने तसेच रॅलीच्या औचित्याने गस्तीची संकल्पना प्रत्यक्षात आणल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले. या सायकलला बीट मार्शलसाठी असलेल्या मोटारसायकलींचा निळा, हिरवा आणि पांढऱ्या पट्टयांचा रंग दिलेला आहे. बीट मार्शल सायकलींचे उद्घाटन उपायुक्त गणेश गावडे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.