प्रदूषणविरहित ठाण्यासाठी पोलिसांची सायकलस्वारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2019 12:39 AM2019-06-05T00:39:21+5:302019-06-05T00:39:26+5:30
वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी, वाहतूक कोंडीवर नियंत्रण यावे तसेच आरोग्य तंदुरुस्तीसाठी सायकलचा वापर केल्यास अनेक फायदे होऊ शकतात.
जितेंद्र कालेकर
ठाणे : वाढत्या वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सायकलचा अधिकाधिक वापर होणे अपेक्षित आहे. त्याबाबत जागृती करण्यासाठी जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्याच्या नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी ठाण्यातील काही तरुण मंडळींसह नुकतीच ठाणे ते गेटवे आॅफ इंडिया (मुंबई) अशी सायकल सफर केली.
वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी, वाहतूक कोंडीवर नियंत्रण यावे तसेच आरोग्य तंदुरुस्तीसाठी सायकलचा वापर केल्यास अनेक फायदे होऊ शकतात. हा सकारात्मक विचार लोकांमध्ये रुजविण्यासाठी आपण स्वत:पासून काहीशी सुरुवात करावी, या संकल्पनेतून जाधव यांच्यासह ठाण्यातील होतकरू ब्लॉकबस्टर सायकल ग्रुपमधील संदेश राव, साजिद खाकीयनी, पवन मेमन, अनुराग नाईक, संजय मिश्रा, चिराग शहा, अजय सिंग, सचिन चौधरी आणि दिग्विजय गर्जे यांनी पर्यावरण दिनाचे औचित्य साधत २ जूनला पहाटे ५.३० वाजता तीन हात नाका ते मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया, नरिमन पॉइंट्स हे ४७ किलो मीटरचे अंतर दोन तासांनी सकाळी ७.३० वाजता पार केले.
पर्यावरण संरक्षण, वाहतूक कोंडी टाळणे, व्यक्तिगत स्वास्थ राखणे, असे उद्देश यामागे असल्याचे जाधव यांनी सांगितले. सायकल रॅलीतून एक वेगळे समाधान मिळाल्याचेही खाकीयनी म्हणाले.