लॉकडाऊनसाठी ठाणे जिल्ह्यात ३१ ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:43 AM2021-04-23T04:43:15+5:302021-04-23T04:43:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : राज्य शासनाच्या ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेंतर्गत कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी २२ एप्रिलपासून लॉकडाऊनचे ...

Police blockade at 31 places in Thane district for lockdown | लॉकडाऊनसाठी ठाणे जिल्ह्यात ३१ ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी

लॉकडाऊनसाठी ठाणे जिल्ह्यात ३१ ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : राज्य शासनाच्या ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेंतर्गत कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी २२ एप्रिलपासून लॉकडाऊनचे निर्बंध अधिक कडक केले आहेत. या पार्श्वभूमीवर विनाकारण फिरणाऱ्यांवर, तसेच शहर आणि जिल्ह्याची वेस अत्यावश्यक कारणाशिवाय ओलांडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. अशा कारवाईसाठी ठाणे ग्रामीणमध्ये चार, तर शहर आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील २७ ठिकाणी नाकाबंदी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या काही दिवसांपासून वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता राज्य शासनाने गुरुवारी रात्री ८ वाजेपासून ते १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत राज्यभर कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये शहर आणि जिल्हाबंदीबाबतचे नियम अधिक काटेकोरपणे पाळले जाणार आहेत. त्यामुळे ठाणे ग्रामीण पोलिसांच्या अखत्यारीत येणाऱ्या पुणे, नाशिक आणि अहमदनगर, या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर तपासणी नाके उभारले आहेत. यामध्ये कसारा, टोकावडे, गणेशपुरी आणि कुळगाव या चार महत्त्वाच्या नाक्यांसह पोलीस ठाण्यांच्या अंतर्गतही नाकाबंदी आहे. याशिवाय, ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाील ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट, या पाच परिमंडळांमधील ३५ पोलीस ठाण्यांतर्गत २७ ठिकाणी चेकनाके उभारले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडणाऱ्यांवर याठिकाणी साथ प्रतिबंधक कायदा कलम १८८ अंतर्गत कारवाईचा इशारा ठाणे पोलिसांनी दिला आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आणि सहपोलीस आयुक्त सुरेश मेकला यांच्या आधिपत्याखालील हा संपूर्ण पोलीस बंदोबस्त राहणार असून, पोलीस ठाण्यांच्या पातळीवरील पेट्रोलिंग, फिक्स पॉइंट, कोविड सेंटर आणि महत्त्वाच्या नाक्यांवर पोलिसांमार्फत कारवाई केली जाणार आहे.

असा राहणार बंदोबस्त-

राज्य राखीव दलाच्या पाच कंपन्या (एका कंपनीत १०० कर्मचारी), ५०० गृहरक्षक दलाचे जवान, मुख्यालयातील तीन हजार ५०० पोलीस, तसेच स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त तपासणीला तैनात राहणार आहे.

अशी होणार कारवाई-

अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरणारे, वाहनांद्वारे शहर आणि जिल्हा ओलांडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे वैद्यकीय तसेच अत्यावश्यक कारणाव्यतिरिक्त कोणीही बाहेर पडू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

अत्यावश्यक तसेच रुग्णालयीन कारण असेल, तर तशी कागदपत्रे संबंधितांनी दाखविल्यास त्यांना अनुमती दिली जाईल; पण बाहेर जाण्यासाठी कोणताही पास दिला जाणार नसल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.

Web Title: Police blockade at 31 places in Thane district for lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.