तळीरामांविरोधात पोलिसांची मोहीम
By admin | Published: December 24, 2015 01:31 AM2015-12-24T01:31:43+5:302015-12-24T01:31:43+5:30
थर्डी फर्स्टची मजा लुटताना सावध रहा. वाहतूक पोलिसांची तुमच्यावर करडी नजर आहे. दारु पिऊन गाडी चालवणार असला, धिंगाणा करणार असाल तर थेट
शशी करपे, वसई
थर्डी फर्स्टची मजा लुटताना सावध रहा. वाहतूक पोलिसांची तुमच्यावर करडी नजर आहे. दारु पिऊन गाडी चालवणार असला, धिंगाणा करणार असाल तर थेट तुुुरुंगाची हवा खावी लागेल. पोलिसांनी आतापासूनच मोहिम हाती घेऊन मद्यपींविरोधात कारवाई सुुरु केली आहे.
पालघर जिल्ह्यात खासकरून वसई, पालघर आणि डहाणू समुद्रकिनारी रिसॉर्ट, फॉर्म आणि पर्यटन स्थळे असल्याने थर्टी फर्स्टच्या निमित्ताने पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. त्याठिकाणी होणाऱ्या पार्ट्यांमध्ये दारुची सर्रास विक्री होते. त्यानंतर तळीरामांचा धिंगाडा रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आतापासूनच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सध्या वाहतूक पोलिसांकडे चार बी्रथ अनालायझर असून आणखी नव्या नऊ मशीन खरेदी करण्यात आल्या आहेत. स्थानिक पोलिसांनी खबरदारी म्हणून ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी आणि मद्यपींवर कारवाई सुुुरु केली आहे. थर्टी फर्स्टच्या दोन दिवस आधी आणि नंतरपर्यंत एक दिवस पोलीस तळीरामांवर नजर ठेऊन असणार आहेत. रिसॉर्ट, हॉटेल आणि फॉर्म बाहेर पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. बारमधून बाहेर निघालेला इसम गाडी चालवताना दिसला की लगेचच त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे. गेल्या वर्षभरात पोलिसांनी ४२ हजार २६४ मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करुन त्यांच्याकडून ७४ लाख ४७ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर दरम्यान ३९ हजार ७०४ तळीरामांवर करावाई करताना ७० लाख ८१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. तर १ डिसेंबर ते १८ डिसेंबर दरम्यान १ हजार ५६० तळीरामांवर कारवाई करुन ३ लाख ६७ हजार रुपये दंड वसूल केला गेला आहे. मद्यपान करुन वाहने चालवणे दंडनिय अपराध आहे. असे असताना वसई तालुक्यात मोठ्या प्रमाणात मद्यपान करुन वाहने चालवली जात असल्याचे वाहतूक शाखेने गेल्या वर्षभरात केलेल्या कारवाई करुन उघडकीस आले आहे. मद्ययान करुन वाहने चालवण्यामुळे वाहन चालक स्वतचा जीव धोक्यात घालण्याबरोबरच अन्य वाहनचालक व पादचाऱ्यांंच्या जीवालाही धोका निर्माण करीत असतात. या पार्श्वभूमीवर तळीरामांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पालघर पोलीस अधिक्षक शारदा राऊत यांनी दिले आहेत. त्यानंतर वसई वाहतूक शाखेचे पोलीस निरिक्षक रणजित पवार आणि सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रविण सावंत यांनी तळीरामांविरोधात कडक मोहिम हाती घेतली आहे.