आई-वडील कोरोना बाधित झाल्यानं मुलगा एकाकी; पोलिसांनी वाढदिवस साजरा करत जपली माणुसकी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 10:12 PM2020-09-15T22:12:45+5:302020-09-15T22:14:03+5:30
ट्विटरद्वारे केलेल्या आवाहनाला पोलिसांकडून प्रतिसाद
ठाणे: पोलिसांच्या खाकी वर्दीमध्येही एक हळवा माणूस असतो. याचा प्रत्यय डायघर पोलिसांनी एका छोटया प्रसंगातून दर्शविला. कोरोनाबाधित असल्यामुळे मुलाचा वाढदिवस कसा साजरा करायचा?, हा प्रश्न एका पित्याला भेडसावत होता. याची माहिती ट्वीटरद्वारे मिळताच सात वर्षीय लहानग्याचा वाढदिवस डायघर पोलिसांनी मंगळवारी त्याच्या घरी जाऊन साजरा केला. पोलिसांनी दाखविलेल्या माणुसकीमुळे पोलिसांसह सर्वांनाच अश्रू अनावर झाले.
द्रिश गुप्ता सात वर्षीय मुलगा आपले वडील दिनेश आणि आईसोबत निर्मलनगरी, खर्डीपाडा वास्तव्यास आहे. काही दिवसांपूर्वी दिनेश आणि त्यांच्या पत्नी हे दोघे कोरोनाबाधित झाले. त्यांना वाशी येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे. द्रिश हा त्याची आजी इतर लहान भावंडांसह घरी होता. दरम्यान, 15 सप्टेंबर रोजी द्रिशचा वाढिदवस असूनही तो साजरा करु शकत नसल्याची सल गुप्ता दाम्पत्याला होती. तरीही मुलाचा वाढदिवस साजरा करायचाच या इराद्याने त्यांनी 13 सप्टेंबर रोजी रात्री जवळपास 11.15 वाजता ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या ट्विटरवर ट्वीट करून माहिती दिली की, द्रिश या त्यांच्या मुलाचा 15 सप्टेंबर रोजी आहे. मात्र, आम्ही रुग्णालयात तर घरात केवळ वयोवृद्ध आई आणि लहान मुलेच घरी आहेत.
द्रिश नेहमीच पोलीस बनण्याची इच्छा व्यक्त करीत असतो. त्यामुळे पोलिसांनीच शक्य होईल, तसा त्याचा वाढदिवस साजरा करावा. ही माहिती मिळताच शीळ डायघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव सहाय्यक पोलीस निरिक्षक ब्रिजेश शिंदे, विशाल चिटणीस, कृपाली बोरसे, पोलिस उपनिरिक्षक सुजाता पाटील, पोलिस नाईक प्रदीप कांबळे आणि इतर कर्मचाऱ्यांनीही मंगळवारी खर्डीपाडा येथील गुप्ता यांचे घर गाठले. घरातील सर्वानाच त्यांनी सुखद धक्का देत द्रीशचा वाढिदवस साजरा करून त्यास शुभेच्छा दिल्या. वाढदिवसाला नेमके आईवडील या लहान मुलांजवळ नव्हते. परंतु, पोलिसांनी अचानक येऊन वडिलकीच्या नात्याने वाढदिवस साजरा केल्यामुळे सोसायटीतील रहिवाशांनाही हायसे वाटले. या प्रसंगाने सर्वच उपस्थित भारावले होते.