ठाण्याचे पोलिस आयुक्त हाजीर हो... रोशनी शिंदे मारहाण प्रकरणात महिला आयोगाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2023 08:31 AM2023-04-07T08:31:54+5:302023-04-07T08:32:26+5:30
ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाकडून मारहाण झाल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीप्रकरणी पोलिस निरीक्षकांनी सादर केलेल्या अहवालावर महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी असमाधान व्यक्त केले आहे. ठाणे पोलिस आयुक्तांनी मंगळवारी महिला आयाेगाच्या कार्यालयात हजर राहून स्वत: अहवाल सादर करावा, असे आदेश त्यांनी दिले आहेत.
ठाण्यात रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाणीची गंभीर दखल घेत महिला आयोगाने पोलिस आयुक्तांना तातडीने अहवाल सादर करण्याची सूचना केली होती. त्यानुसार कासारवडवली पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांनी अहवाल सादर केला. अहवालात दोन अज्ञात महिलांविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंद करून न्यायालयाच्या परवानगीने पुढील तपास सुरू असल्याचे नमूद करण्यात आले होते. या अहवालावर आयोगाकडून असमाधान व्यक्त करण्यात आले.
रोशनी शिंदे यांच्या कार्यालयात घुसलेल्या जमावातील लोक व तेथे झालेला वाद माध्यमांनी प्रसारित केलेल्या चित्रफितींमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या कारवाईबाबत आयोग असमाधानी आहे, असे नमूद करीत पोलिस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.