ठाण्यातील दूध विक्रेत्यांना बसला लाठीचा मार: तक्रार येताच विशेष पासेस देण्याचे पोलीस आयुक्तांचे आदेश
By जितेंद्र कालेकर | Published: March 30, 2020 08:34 PM2020-03-30T20:34:06+5:302020-03-30T20:44:59+5:30
नौपाडयात दूध विक्री करु न परतणाऱ्या दोघांवर पोलिसांनी सौम्य लाठी हल्ला केला होता. या संदर्भातील तक्रार आल्यानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी गंभीर दखल घेत ठाणे शहरातील सर्व दूध विक्रेत्यांना संबंधित पोलीस ठाणे किंवा पोलीस उपायुक्तांच्या मार्फतीने अत्यावश्यक सेवेचे पासेस देण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत.
जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणो: शहरातील कळवा आणि नौपाडा या दोन वेगवेळया भागांमध्ये संचारबंदीच्या काळात पोलिसांनी दूध विक्र ेत्यांवर कारवाई केल्याने या विक्रेत्यांमधून नाराजीचा सूर होता. कळव्यात गुन्हे दाखल केले होते. तर नौपाडयात दूध विक्री करु न परतणा-या दोघांवर पोलिसांनी सौम्य लाठी हल्ला केला होता. या संदर्भातील तक्रार आल्यानंतर पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी गंभीर दखल घेत ठाणे शहरातील सर्व दूध विक्रेत्यांना संबंधित पोलीस ठाणे किंवा पोलीस उपायुक्तांच्या मार्फतीने अत्यावश्यक सेवेचे पासेस देण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत.
नौपाडयातील मल्हार सिनेमा समोरील रस्त्याने २४ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास ओंकार जाधव (१९, रा. आनंदनगर, कोपरी, ठाणो) आणि प्रतिक महालम (२२, रा. आनंदनगर, कोपरी, ठाणे) या दोघांनाही नौपाडा पोलिसांनी लाठीचा फटका मारला. विशेष म्हणजे त्याच मार्गावरु न आधी ते दूध घेऊन जात होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली तेंव्हा त्यांनी आपण दूध घेऊन जात असल्याचे सांगितले. एका व्यापा-याला २० लीटर दूध देऊन ते परतल्यानंतर मात्र त्यांच्यावर गस्तीवरील पोलिसांच्या एका पथकाने लाठी हल्ला केला. दरम्यान, कळव्यातही अशाच प्रकारे दोन विक्रेत्यांविरुद्ध रस्ता अडवून दूधाची विक्री केल्याप्रकरणी कलम १०२ नुसार पोलिसांनी कारवाई केली. तर वर्तकनगर भागात २४ मार्च रोजी सकाळी ग्राहकांनी दूध खरेदीसाठी गर्दी केल्यामुळे पोलिसांनी तिथेही कारवाईचा इशारा देताच तिथून विक्रेत्यांनी पळ काढला. ठिकठिकाणी होणा-या अशा कारवायांमुळे दूध विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण असून काहीतरी ओळखपत्र किंवा नियमावली असावी, अशी मागणी ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्थेचे सह सचिव पांडूरंग चोडणेकर यांनी केली. त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तुम्ही १४ एप्रिलनंतरच त्यांना भेटू शकता असे त्यांना जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’कडे ही आपबिती कथन केली. तेंव्हा प्रस्तुत प्रतिनिधीने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आणला. याची गांभीर्याने दखल घेत ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व दूध विक्र ेते आणि दारोदारी दूध टाकणा-या तरु णांना संबंधित पोलीस ठाणे अथवा पोलीस उपायुक्त यांच्या कार्यालयातून अत्यावश्यक सेवेची ओळखपत्र देण्याबाबतचे आदेश त्यांनी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त दीपक देवराज तसेच ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट येथील पोलीस उपायुक्तांना दिले. कोणत्याही दूध विक्रेत्यावर अशा प्रकारे कारवाई करण्यात येऊ नये, असे आदेश दिल्याचेही फणसळकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
‘‘ दूध विक्रेत्यांना अत्यावश्यक सेवा म्हणून संबंधित पोलीस ठाण्यामार्फत पोलिसांकडून ओळखपत्र दिली जातील. तसेच अनावश्यक कोणावरही कारवाई न करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. यापुढेही देण्यात येतील.’’
विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे शहर
‘‘ दूध विक्रेत्यांवरही नाहक लाठीहल्ला किंवा गुन्हे दाखल होणार असतील तर दूध विक्री करायची कशी? यात ठोस नियमावली किंवा ओळखपत्र देण्याची गरज आहे.’’
पांडूरंग चोडणेकर, सह सचिव, ठाणे शहर दूध व्यावसायिक कल्याणकारी संस्था, ठाणे