थेट हजेरीवरच ठाण्याच्या पोलीस आयुक्तांनी कर्मचाऱ्यांना दिले कोरोनाविरुद्ध लढण्याचे बळ
By जितेंद्र कालेकर | Published: April 21, 2020 11:55 PM2020-04-21T23:55:50+5:302020-04-22T00:03:56+5:30
ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सोमवारी मोबाईलद्वारे संवाद साधत कोरोनाविरुद्ध लढणा-या आपल्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. शिवाय, चांगल्या कामाचे कौतुक करुन कोरोनाविरुद्ध लढण्याचे बळही दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: थेट हजेरीवरच पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सोमवारी मोबाईलद्वारे संवाद साधत कोरोनाविरुद्ध लढणा-या आपल्या कर्मचा-यांचे कौतुक केले. शिवाय, चांगल्या कामाचे कौतुक करुन कोरोनाविरुद्ध लढण्याचे बळही दिले. यावेळी विलगीकरण केलेल्या मुंब्रा पोलीस ठाण्यातील १४ कर्मचाºयांची कोरोनाची चाचणी निगेटीव्ह आल्याचीही त्यांनी माहिती देताच कर्मचा-यांनी त्याला टाळया वाजून उत्स्फूर्त दाद दिली.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील उल्हासनगर परिमंडळातील अंबरनाथ, ठाण्यातील मुंब्रा, नौपाडा तसेच भिवंडीतील नारपोली या पोलीस ठाण्यांमधील कर्मचा-यांशी सोमवारी आणि मंगळवारी फणसळकर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या कर्मचा-यांना धीर, प्रोत्साहन आणि बळ देण्यासाठी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. अंबरनाथच्या बुवापाडा भागात कोरोनाचा रुग्ण मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी अंबरनाथ पोलीस ठाण्यातील कर्मचाºयांशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मोबाईलवरुन संवाद साधला. मोबाईलचा आवाज मेगाफोनला जोडण्यात आल्याने आयुक्तांना सर्व अधिकारी आणि कर्मचाºयांशी संवाद साधता आला. यावेळी कोरोनासारख्या साथीच्या आजाराचा लोकांमध्ये प्रादूर्भाव होऊ नये यासाठी कर्मचारी जे रस्त्यावर येऊन प्रयत्न करीत आहेत. ते अत्यंत कौतुकास्पद आहे. विनाकारण फिरणााºया नागरिकांवरील कारवाई असो की नागरिकांवर ठेवलेली करडी नजर हे सर्व काम दखल घेण्याजोगे आहे. यावेळी आयुक्तांनी मेगाफोनद्वारे नागरिकांमध्ये कोरोनाबाबतची जनजागृती तसेच लॉकडाऊनच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. ज्या ठिकाणी नियम पाळले जातात, तिथे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आहे. किंवा रुग्णही आढळलेला नाही. अंबरनाथच्या पोलिसांनी कठोर परिश्रम घेत असल्याबद्दलही त्यांनी कौतुक केले. शिवाय, त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचे मनोधैर्य वाढविले.
पोलिसांची आताची वेळ ही कसोटीची असून आपण सर्वांनी ते आव्हान स्विकारले आहे. यात निश्चित यशस्वी होऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नाकाबंदी आणि फिक्स पॉर्इंटवरील पोलिसांनीही सोशल डिस्टन्स राखून डयूटी करावी. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा. लोकांशीही संयमाने वागा. स्वत:चे आणि कुटूंबाच्या आरोग्याची काळजी घ्या. प्रत्येक आठवडयाला सर्व अधिकारी कर्मचारी यांची तपासणी करण्यात येईल. मुंब्य्रातील विलगीकरणातील १४ कर्मचा-यांची तपासणी निगेटीव्ह आल्याचेही आयुक्तांनी सांगताच पोलिसांनी टाळया वाजवून आनंद व्यक्त केला. अशाच प्रकारे आयुक्तांनी ठाणे, कल्याण आणि भिवंडीतील पोलिसांशीही त्यांच्या हजेरीवर मंगळवारी सायंकाळच्या वेळी संवाद साधून मार्गदर्शन केले. आयुक्तांनी पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्याशी संवाद साधल्याने पोलिसांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असून कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी त्यांचे मनोबल उंचावले असल्याचेही मत कर्मचाºयांनी व्यक्त केले.