ठाणे पोलीस तपासणार पालिकेचा पत्रव्यवहार
By admin | Published: October 16, 2015 02:54 AM2015-10-16T02:54:12+5:302015-10-16T02:54:12+5:30
कॉसमॉस ग्रुप प्रकल्पांशी संबंधित ठाणे महानगर पालिकेने (त्यात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने आणि विषय समित्यांनी घेतलेल्या निर्णयांसह) केलेला प्रत्येक पत्रव्यवहार ठाणे पोलिसांनी मागवून घेतला आहे
डिप्पी वांकाणी, मुंबई
कॉसमॉस ग्रुप प्रकल्पांशी संबंधित ठाणे महानगर पालिकेने (त्यात महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने आणि विषय समित्यांनी घेतलेल्या निर्णयांसह) केलेला प्रत्येक पत्रव्यवहार ठाणे पोलिसांनी मागवून घेतला आहे. आता परमार यांच्या कुटुंबियांचे आणि परमार यांच्या भागीदारांचेही म्हणणे नव्याने नोंदवून घेतले जाणार आहे, असे पोलीस दलातील वरिष्ठ सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले.
कॉसमॉस ग्रुपमध्ये परमार यांचा ३० टक्के भागीदारी होती व ते ग्रुपमध्ये वर्किंग पार्टनर होते. आता त्यांचे भागीदार त्यांच्या प्रकल्पांमध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कोणते आक्षेप घेतले होते याबद्दल आपल्या आर्किटेक्टशी चर्चा करीत आहेत. परमारच्या भावाने सांगितले की आयकर विभागाने दोन वर्षांपूर्वी त्याच्या कंपनीवर छापा टाकला होता आणि ४० कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. तो आता आम्हाला भरायचा होता.
आम्ही न्याय वैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालाची वाट बघत आहोत. आम्ही परमार यांचे भागीदार आणि कुटुंबीय यांचे म्हणणे नोंदवून घेणार आहोत. शिवाय परमार यांच्यावर मागे ज्या खात्यांनी खटले भरले होते त्यांच्याकडून तपशील मागवणार आहोत, असे सह आयुक्त (गुन्हे) व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी सांगितले. लक्ष्मीनारायण म्हणाले की,‘‘परमार यांच्या लेखाधिकाऱ्याचेही म्हणणे नोंदवून घेतले जाईल. पोलिसांनी परमार यांच्या कार्यालयातून हार्डडिस्कही जप्त केली आहे. आम्ही आता आर्किटेक्टची भेट घेऊन नेमके कोणते आक्षेप घेण्यात आले होते हे तपासणार आहोत.’’ ठाण्यात ग्रुपच्या सगळ््या कामांना ज्या काही परवानग्या लागायच्या त्या सगळ््या परमार मिळवायचे. परमार यांनी कधीही माझ्यावर खूप दडपण आहे, असे आम्हाला सांगितले नाही. अन्यथा त्यावर काही उपाय शोधता आला असता, असे त्यांचे व्यावसायिक भागीदार मनीष मेहता यांनी सांगितले. मेहता म्हणाले की,‘‘ठाण्यात ज्या ७-८ प्रकल्पांचे बांधकाम सुरू होते त्यापैकी कॉसमॉस ज्युवेल प्रकल्पाचे काम थांबविण्याचा आदेश देण्यात आला होता.’’
परमार यांचे चुलत भाऊ हेमंत म्हणाले की,‘‘सूरज आम्हाला गेली सहा महिने सांगत होता की तो भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे त्रासलेला असून हा व्यवसाय मला सोडावासा वाटतोय. तो मला नेहमी सांगायचा की, मी एका अधिकाऱ्याला भेट दिली की तो (अधिकारी) कार्यालयात जाऊन इतर अधिकाऱ्यांना सांगायचा की त्याच्याकडून (परमार) काहीतरी वसूल करा.’’ कॉसमॉसमध्ये सूरज परमारची जबाबदारी ही प्रकल्पासाठी जागा निश्चित करायची, ती विकत घ्यायची, त्यासाठी सगळ््या परवानग्या मिळवायच्या, बांधकाम करून घ्यायचे व फ्लॅटस्ही विकायचे अशी होती. ते ग्रुपमध्ये वर्किंग पार्टनर असल्यामुळे सगळ््या परवानग्या (क्लिअरन्सेस) घ्यायची त्यांचीच जबाबदारी होती, असेही हेमंत म्हणाले. सूरजने कधीही त्याला अंडरवर्ल्डकडून धमक्या आल्याचे म्हटले नाही आणि याक्षणी आम्ही कोणत्याही स्वरुपाच्या पोलीस संरक्षणाची मागणी करीत नाहीत, असे त्यांनी सांगितले.