मीरा-भाईंदरमध्ये विनामास्क १६४ वाहनचालकांवर पोलिसांचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:19 AM2021-02-28T05:19:57+5:302021-02-28T05:19:57+5:30
मीरा रोड : कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून पोलिसांनी मीरा-भाईंदरमध्ये मास्क न घालताच फिरणाऱ्या बेजबाबदार लोकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा ...
मीरा रोड : कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून पोलिसांनी मीरा-भाईंदरमध्ये मास्क न घालताच फिरणाऱ्या बेजबाबदार लोकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. एकट्या वाहतूक पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत अशा १६४ वाहनचालकांवर कारवाई करून सुमारे ८२ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
मीरा-भाईंदरमध्ये कोरोनारुग्णांची संख्या वाढत चालली असून, शुक्रवारपर्यंत शहरात आतापर्यंतच्या रुग्णांचा आकडा २७ हजार ८ तर कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या ८०४ वर गेली आहे. अनेक बेजबाबदार लोक तसेच दुकानदार, फेरीवाले, हॉटेल-बार कर्मचारी मास्क घालत नसल्याने कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झालेला आहे. त्या अनुषंगाने आता महापालिकेने मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करून दंडात्मक रक्कम वसूल करण्याची जबाबदारी पोलिसांवरसुद्धा सोपवली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यासह वाहतूक पोलिसांनासुद्धा दंडाची पावती पुस्तके दिली गेली आहेत.
* ५०० दंड
शहरात पोलिसांनी मास्क न घालणाऱ्यांवर आता प्रत्येकी ५०० रुपये दंड वसुली सुरू केली आहे. दंड न भरल्यास गुन्हा दाखल केला जाणार आहे. वाहतूक पोलिसांनीसुद्धा गेल्या दोन दिवसांत नाकाबंदीदरम्यान मास्क न घालणाऱ्या १६४ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मास्क नसल्याने दंड वसूल करतानाच पोलीस त्यांना मोफत मास्कसुद्धा देत आहेत.