पोलिसांनी हद्द ओलांडली; तक्रार नंतर, आधी हद्द कुठली ती सांगा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:48 AM2021-09-08T04:48:08+5:302021-09-08T04:48:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : अनेकदा खून, अपघात किंवा आत्महत्येसारखा प्रकार घडल्यास पोलीस हद्द तपासतात. हद्दीच्या बाहेर प्रकार असेल ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : अनेकदा खून, अपघात किंवा आत्महत्येसारखा प्रकार घडल्यास पोलीस हद्द तपासतात. हद्दीच्या बाहेर प्रकार असेल तर गुन्हा दाखल करून घेतला जात नाही. मुळात, असा गुन्हा दाखल करून तो नंतरही वर्ग करता येतो. ठाण्यातही हद्दीचे वाद अनेकदा घडल्याची माहिती स्थानिक पोलिसांनीच दिली.
अनेकदा गुन्हा घडलेल्या ठिकाणापासून एखादे पोलीस ठाणे जवळच असते मात्र ते त्या हद्दीतच नसते. तक्रारदार तिथे गेल्यानंतर त्याची हद्दीतल्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी चांगलीच दमछाक होते. अनेकदा हद्दीवरून पोलिसांमध्येही वाद रंगतात. प्रत्यक्षात सीआरपीसी १५४ प्रमाणे तक्रारदार ज्या पोलीस ठाण्यात गेला आहे, तिथेच गुन्हा दाखल करणेही बंधनकारक आहे.
* तर होऊ शकते कारवाई - हद्दीवरून वाद घातला किंवा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली तर संबंधित पोलिसांवर कारवाई होऊ शकते, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
* ही घ्या उदाहरणे -
कोपरी पुलावर रेल्वेतून खाली पडून एकाचा मृत्यू झाला होता. त्यावेळी गुन्हा रेल्वे की ठाणेनगर पोलिसांकडे दाखल करायचा? यावरून बरीच खलबते झाली. अखेर हे प्रकरण ठाणे रेल्वे पोलिसांकडे दाखल झाले होते.
* अलीकडे भारत जैन या व्यापाऱ्याचा मृतदेह कळवा आणि नारपोली पोलीस ठाण्याच्या सीमेवरील खाडीत मिळाला होता. त्यावेळीही हद्दीवरून संभ्रम निर्माण झाला होता. अखेर कळवा पोलिसांकडे हा गुन्हा दाखल झाला होता.
* कळवा खाडीमध्ये एकाने काही दिवसांपूर्वी उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्यावेळी ही हद्द कळवा, कोपरी की ठाणेनगर पोलिसांची यावरून चांगलाच वाद रंगला होता. त्यावेळी कोपरी पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून प्रकरण ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.
......
हद्दीवरून पोलिसांनी वाद घालण्याचा प्रश्नच नाही. शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करून तो नंतर संबंधित पोलीस ठाण्याकडे वर्ग करता येतो.
व्यंकट आंधळे, सहायक पोलीस आयुक्त, कळवा
......................
* ठाणे शहर आयुक्तालयातील पोलीस ठाणी -३५
पोलीस अधिकारी -७१०
पोलीस अंमलदार -८,४८६