मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना पोलीस कोठडी, फेरीवाल्यांच्या सामानाची नासधूस प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 09:44 PM2017-10-24T21:44:01+5:302017-10-24T21:44:21+5:30
ठाणे - रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांच्या सामानाची नासधूस करीत त्यांना पिटाळून लावणाºया महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह पाच जणांना ठाणे न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. त्यामुळे त्यांचा पोलीस कोठडीतील मुक्काम एक दिवस आणखी वाढला आहे.
नौपाडा पोलिसांनी जाधव यांना सोमवारी त्यांच्या घरातून ताब्यात घेतल्यानंतर त्यांना अत्यंत नाट्यमयरीत्या ठाणेनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांना नौपाडा किंवा ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्याची अपेक्षित असताना त्यांना अचानकपणे राबोडी पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आले. सोमवारी दुपारी अवघ्या काही तासांच्या अंतराने झालेल्या घडामोडींबाबत काही पोलीस अधिकारीही अनभिज्ञ होते. नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या कार्यकर्त्यांना ठाणेनगर आणि नौपाडा दोन्ही पोलिसांनी त्यांच्या अटकेची तयारी केली. अखेर पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी यांच्या आदेशाने आधी त्यांना ठाणेनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. वरीष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांनी त्यांना अटक केल्यानंतर मंगळवारी ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले.
सॅटीस ब्रिजवरील विक्रेत्यांचे बाकडे तोडून त्याचे नुकसान करणे तसेच रिक्षाचालकांना हुसकावून लावल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात २१ आॅक्टोबर रोजी गुन्हा दाखल झाला होता. त्यांना याप्रकरणी २५ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले. दरम्यान, ही कोठडी संपताच नौपाडा पोलीस बुधवारी त्यांना ताब्यात घेतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.