जळीतकांडातील बहादूरला ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
By admin | Published: January 5, 2016 01:03 AM2016-01-05T01:03:45+5:302016-01-05T01:03:45+5:30
मीरा रोड जळीतकांडातील आरोपी बहादूरसिंग परमार याला सोमवारी ठाणे न्यायालयाने ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
मीरा रोड : मीरा रोड जळीतकांडातील आरोपी बहादूरसिंग परमार याला सोमवारी ठाणे न्यायालयाने ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. बहादूरने आपली दुसरी पत्नी तानिया व तिची भाची शुकीला यांची पेट्रोल टाकून जाळून हत्या केली आहे. पोलिसांनी राजस्थानातून रविवारी त्याला अटक केली.
मीरा रोड, हबटाऊन गार्डेनियाच्या एका सदनिकेत भाड्याने राहणाऱ्या तानिया बहादूरसिंग (२६), तिचा १३ महिन्यांचा मुलगा जयदेव व भाची शुकीला शेख (१८) यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. गुरु वारी, ३१ डिसेंबरच्या पहाटे ही घटना घडली. तानिया व शुकीला मरण पावली तर जयदेव वाचला. या जळीतकांडानंतर पसार झालेला बहादूरसिंग परमार याला राजस्थानच्या माउंट आबू रोड येथून शनिवारी मीरा रोड पोलिसांनी अटक केली होती.
बहादूरची पहिली पत्नी असून तिच्यापासून त्याला तीन मुले आहेत. ते खारदांडा येथे राहतात. तानियापासून त्याला जयदेव हा मुलगा झाला. परंतु, बहादूर व तानियाने आपली पती-पत्नी म्हणून ओळख दाखवली असली तरी त्यांनी लग्न केले नव्हते, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
हत्याकांडाच्या आदल्या रात्री ३० डिसेंबर रोजी बहादूर हा पेट्रोलचा कॅन तसेच खाद्यपदार्थ घेऊन आला होता. पेट्रोलचा कॅन त्याने जिन्यावर लपवून ठेवला होता. आग लागल्याचे समजताच रखवालदार व रहिवाशांनी दार तोडून आत प्रवेश केला व जयदेवला वाचवले. आग लागल्यानंतरदेखील तानिया वा शुकीलाचा आरडाओरडा शेजाऱ्यांना ऐकू न आल्याने बहादूरने त्यांना खाण्यातून गुंगीचे औषध दिले असावे, अशी शक्यता आहे. मृतांचा व्हिसेरा राखून ठेवला असून न्यायवैद्यक शाळेचा तपासणी अहवाल येण्याची प्रतीक्षा असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)