धनंजय कुलकर्णीला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 04:52 AM2019-01-20T04:52:51+5:302019-01-20T04:52:56+5:30
बंदी असलेल्या शस्त्रांची विक्री करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता व भाजपाचा डोंबिवली पूर्वेचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी (४९) याला कल्याण न्यायालयाने मंगळवार, २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कल्याण : बंदी असलेल्या शस्त्रांची विक्री करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता व भाजपाचा डोंबिवली पूर्वेचा उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी (४९) याला कल्याण न्यायालयाने मंगळवार, २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला आता गती मिळण्याची शक्यता आहे.
कुलकर्णीने आपल्या ‘तपस्या हाउस आॅफ फॅशन’ या दुकानात बंदी असलेल्या शस्त्रांचा साठा विक्रीस ठेवला होता. याप्रकरणी त्याला १४ जानेवारीला रात्री कल्याण गुन्हे शाखेने अटक केली होती. त्यानंतर, त्याला १५ तारखेला कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे पोलिसांना कुलकर्णीकडे सापडलेल्या शस्त्रसाठ्याबाबत चौकशी करता आली नव्हती. परिणामी, चौकशीसाठी कुलकर्णीला पोलीस कोठडी मिळावी, यासाठी सरकारी वकिलामार्फत पोलिसांनी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर शनिवारी सुनावणी झाली.
यावेळी, कुलकर्णी याने ही शस्त्रे कशासाठी आणली, कुठून आणली, तसेच यात त्याच्यासह अजून कोणाचा सहभाग आहे का? याबाबतचा तपास करायचा असल्याचे सरकारी वकील योगेंद्र पाटील यांनी न्यायालयात सांगितले. तर, कुलकर्णीचे दुकान असून व्यवसायासाठीच त्याने ही शस्त्रे आणली होती, अशी बाजू त्याच्या वकिलाने मांडली. त्यावर, कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. डी.एस. हातरोटे यांनी कुलकर्णीला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यामुळे त्याचा ताबा कल्याण गुन्हे शाखेने घेतला आहे.
>दुकानात ठेवला होता साठा
कुलकर्णी याचे पूर्वेतील मानपाडा रोडवरील महावीरनगरातील अरिहंत इमारतीमध्ये ‘तपस्या हाउस आॅफ फॅशन’ हे दुकान आहे. त्यात त्याने बंदी असलेल्या शस्त्रांचा साठा विक्रीस ठेवला होता. याप्रकरणी त्याला १४ जानेवारीला रात्री कल्याण गुन्हे शाखेने अटक केली..