रिक्षाचालकांच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2020 12:27 AM2020-08-09T00:27:06+5:302020-08-09T00:27:12+5:30
आजचे उपोषण पुढे ढकलले; कृती समितीची माहिती
ठाणे : लॉकडाऊनमुळे रिक्षाचालक आणि त्यांच्या कुटुंबीयांची पुरती वाताहत झाली आहे. मात्र, सरकारला त्याचे कोणतेही सोयरसुतक नाही. त्यामुळे रिक्षाचालकांना अर्थसाह्य देण्यासह कर्जमाफी द्यावी, या मागणीसाठी रिक्षा, टॅक्सी क्रांती संयुक्त कृती समितीने रविवारी ९ आॅगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय या चालकांनी घेतला होता. मात्र, पोलिसांनी या उपोषणाला परवानगी नाकारली आहे. यामुळे ते आंदोलन काही दिवस स्थगित केल्याचेरिक्षा-टॅक्सी क्रांती संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष अनिल चव्हाण आणि प्रदेश सरचिटणीस दयानंद गायकवाड यांनी सांगितले.
लॉकडाऊन कालावधीमध्ये महाराष्ट्रातील आठ आॅटोरिक्षाचालकांनी आत्महत्या केल्या आहेत. कित्येक आॅटोरिक्षाचालक हे नैराश्येमध्ये जगत आहेत. त्यामुळे प्रत्येकास लॉकडाऊन कालावधीतील प्रत्येक महिन्याकाठी किमान पाच हजारांची आर्थिक मदत शासनाने द्यावी, आत्महत्याग्रस्त आॅटोरिक्षाचालकांच्या कुटुंबास १० लाखांची मदत ताबडतोब करावी, शेतकऱ्यांप्रमाणे संपूर्ण कर्जमाफी मिळावी, आॅटोरिक्षाचालकांना कोविडयोद्धा म्हणून घोषित करून त्यांना ५० लाखांचे विमाकवच जाहीर करावे, कल्याणकारी मंडळाची तातडीने अंमलबजावणी करावी, या मागण्यांसाठी रिक्षाचालक उपोषणाला बसणार होते. मागण्या कधी मान्य होणार याकडे लक्ष आहे.