डोंबिवली स्थानकात गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी महिलांच्या डब्यांजवळ पोलीस तैनात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2019 10:45 AM2019-07-23T10:45:47+5:302019-07-23T10:55:09+5:30
सोमवारी कोपर आणि दिवा स्थानकांदरम्यान लोकलमधून पडून सविता नाईक या महिलेचा मृत्यू झाला होता. या अपघाताची दखल घेत सतर्क महिलांनी आरपीएफ, लोहमार्ग पोलीस यांची भेट घेतली होती.
डोंबिवली - सोमवारी कोपर आणि दिवा स्थानकांदरम्यान लोकलमधून पडून सविता नाईक या महिलेचा मृत्यू झाला होता. या अपघाताची दखल घेत सतर्क महिलांनी आरपीएफ, लोहमार्ग पोलीस यांची भेट घेतली होती. त्या भेटीवेळी केलेल्या मागणीत महिला डब्यासमोर पोलिसांनी उभे रहावे, गाडीत आत जागा असेल तर महिलांना पुढे सरकायला सांगावे आशा मागण्या केल्या होत्या. त्यानुसार डोंबिवलीत फलाट 5, 3 वर पोलीस कार्यरत आहेत. मंगळवारी सकाळपासून पोलीस स्थानकात सतर्क झाले असून, महिलांना सुरक्षित प्रवास करा असे आवाहन करत आहेत.
दरम्यान, 'पोलिसांनी या कामात सातत्य ठेवावे. अशी मागणी महिला प्रवाशांनी यावेळी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. उपनगरीय प्रवासी महासंघ, महिला रेल्वे प्रवासी संघटना यांनी केलेल्या कार्याबद्दल प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. सुखद, संरक्षित, सुरक्षित प्रवासाची आम्हाला हमी द्या अशी मागणी संघटनांनी।केली. पोलीसांनी त्यावर निश्चितच सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
मंगळवारी फलाट 3, 5 या मुबंईकडे जाणाऱ्या लोकलमधील महिला डब्यांसमोर महिला व पुरुष प्रवासी उभे होते. महिला प्रवासी खिडकीजवळ जाऊन महिलांना पुढे सरकण्याचे आवाहन करत होत्या, साधारण गर्दी असे पर्यत हा प्रयत्न सुरू ठेवू असे पोलिसांनी स्पष्ट केले. याच पद्धतीने कल्याण, ठाकुर्ली, दिवा, मुंब्रा, बदलापूर, अंबरनाथ, आसनगाव, टिटवाळा, उल्हासनगर या स्थानकात पोलीस कार्यरत असावेत अशी मागणी सहमहिला प्रवाशांनी केली.