मेंडोन्सांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी

By admin | Published: July 29, 2016 12:46 AM2016-07-29T00:46:30+5:302016-07-29T00:46:30+5:30

बनावट कागदपत्रांच्या आधारे घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथील कोट्यवधी रुपयांची १०८ एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न करणारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा

Police detained by Mendons till Wednesday | मेंडोन्सांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी

मेंडोन्सांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी

Next

ठाणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे घोडबंदर रोडवरील कासारवडवली येथील कोट्यवधी रुपयांची १०८ एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न करणारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांना गुरुवारी ठाणे न्यायालयाने ३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त अविनाश मोहिते यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. फसवणुकीप्रकरणी ठाणेनगर पोलिसांनीही त्यांचा ताबा मिळावा, म्हणून तयारी सुरू केल्याने, त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
अटकेतील केरसी गार्ड, अशोक हिरे, जी.पी. पाल आणि गिल्बर्ट मेंडोन्सा, तसेच अटक नसलेल्या पिलू परवेझ मेहता यांनी आपसात संगनमताने खोटी कागदपत्रे बनवली. यामध्ये पिलू परवेझ मेहता या महिलेच्या कागदपत्रांत फेरफार करून, तिचे नाव पिलूधन मेस्त्री असल्याचे दाखवून, मुंबई उच्च न्यायालय, ठाणे दिवाणी न्यायालय आणि ठाणे तहसीलदार यांची दिशाभूल केली आणि हा गैरव्यवहार केला. बनावट कागदपत्रांच्या आधारे ही हेराफेरी केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर न्यू स्वामी समर्थ कंपनीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि कासारवडवली पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर, मेहता यांनी जमीन आपलीच असून, ती विकण्यासाठी अडथळे आणले जात असल्याचा दावा करून, उच्च न्यायालयात धाव घेतली.
त्या वेळी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्यानुसार, कासारवडवली पोलिसांनी केलेल्या चौकशीत पिलू परवेझ मेहता, त्यांचा भाऊ केरसी गार्ड, गिल्बर्ट मेंडोन्सा, त्याचा साथीदार हिरे आणि अ‍ॅड. लाल यांनी बोगस कागदपत्रे तयार करून जमीन बळकावण्याचा घाट घातल्याचे उघडकीस आल्याने, या प्रकरणी फेब्रुवारी २०१६ मध्ये मेंडोन्सा यांच्यासह पाचही जणांच्या विरोधात कासारवडवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर, पोलिसांनी फेब्रुवारी ते मे २०१६ दरम्यान केरसी गार्ड, अशोक हिरे आणि जी.बी. लाल यांना अटक केली. याच दरम्यान, मेंडोन्सा यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज या पूर्वी न्यायालयाने फेटाळला होता. नव्याने केलेला अर्जही ठाणे न्यायालयाने फेटाळल्यानंतर, पोलिसांनी त्यांना बुधवारी अटक केली. (प्रतिनिधी)

- मेंडोन्सा यांना ठाणे न्यायालयात हजर केल्यानंतर, या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्तांनी याचा तपास सहायक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. त्यांना ३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली असून, या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने, चौकशीसाठी ताबा मिळावा, म्हणून त्यांनीही तयारी सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Police detained by Mendons till Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.